
कणकवली : लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कणकवलीत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. कणकवली येथील राणे यांच्या ‘ओम गणेश’ या निवासस्थानी साकारलेले हे वाळूशिल्प सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. समुद्रकिनारी पाहायला मिळणारे वाळूशिल्प यावेळी थेट निवासस्थानी साकारल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
वेंगुर्ला येथील कुशल वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी राणे यांची प्रभावी व्यक्तिरेखा वाळूतून साकारली असून, या अनोख्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या लाडक्या नेत्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अशा आगळ्या वेगळ्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










