कणकवली पर्यटन महोत्सवातून तरुणांना रोजगाराची संधी : नारायण राणे

समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित कणकवली पर्यटन महोत्सवाचं शानदार उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 06, 2023 16:06 PM
views 153  views

कणकवली : १९९० साली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ ३५ हजार होते. ते आजघडीला सव्वादोन लाख झाले आहे. ही प्रगती असली, तरी नजीकच्या गोवा राज्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाख रुपये असून ते पर्यटनाच्या माध्यमातून झाले आहे. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न ५६ लाख रुपये आहे. अशीच प्रगती आपल्याला करायची आहे. एकेकाळी या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नव्हत्या. आपण १९९० साली आमदार झाल्यानंतर जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नासाठी प्रयत्न केले. येथील नैसर्गिक साधन संपत्ती परदेशापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. जिल्हावासीयांना बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात, उद्योगधंद्यांचे ज्ञान मिळावे, यासाठी सिंधुदुर्गासह मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सिंधु महोत्सव सुरु केले. आज नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टिम कणकवली पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगाराची संधी देत आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काढले. 

समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. राणे बोलत होते. व्यासपीठावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रोटरी क्लबचे गोवा येथील पदाधिकारी गौरेश धोंड, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जि. प. माजी अध्यक्ष गोट्या सावंत आदी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, लघु, सुक्ष्म,मध्यम उद्योग मंत्रालयाचा देशाच्या निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा आहे. जीडीपीमध्ये ३० टक्के वाटा आहे. यामध्येही येत्या काळात अमुलाग्र बदल होणार आहेत. माझ्या खात्याचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. जिल्ह्यात अंबानी, अदाणी यांच्यासारखे उद्योजक निर्माण व्हावेत. श्रीमंतांच्या यादीत कोकणवासीय उद्योजकही असावा, असे आपले स्वप्न आहे. वास्तविक चांगल्याला वाईट म्हणणे ही विकृती आहे. पण, नीतेश राणे, समीर नलावडे व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी कुणाच्या टिकेकडे लक्ष न देता काम करीत रहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चांगले काम करीत आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात रवींद्र चव्हाण यांचाही सहभाग आहे. पालकमंत्री व केंद्रीयमंत्री असे आम्ही दोघे एकाच जिल्ह्याचे सुपुत्र आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. वास्तविक ८ जानेवारीला त्रिपुराला असल्याने मी आज उद्घाटनप्रसंगी कणकवलीवासीयांना भेटण्यासाठी आवाजून उपस्थित राहिलो. रवींद्र चव्हाण म्हणाले, नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा घोषीत झाला. त्यानंतरच्या काळात सातत्याने पर्यटनाला चालना देण्याचे काम राणेंच्या माध्यमातून झाले. त्यात गुंतवणूक व दरडोई उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काही नवीन करू इच्छिणाऱ्या तरुणांना संधी असून शेतीपूरक व्यवसाय यावेत, कोकणातील स्थलांतर थांबावे व त्यांना कोकणातच रोजगार मिळावा, असा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्याचे काम होते. कारण, येथील खेळ, कलांना संधी, कला संस्कृती जपणे ही देखील काळाची गरज आहे, त्यामुळे कणकवली पर्यटन महोत्सव कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविकात समीर नलावडे म्हणाले, जिल्ह्यात सर्वप्रथम नारायण राणेंनी सिंधु महोत्सव सुरू केला. जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी राणेंनी प्रयत्न केला. त्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित करीत आहोत.