कणकवली नगरपंचायत निवडणूक लागणार की, प्रशासक

ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन पातळीवर आहे प्रलंबित
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 23, 2023 20:56 PM
views 283  views

कणकवली:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली कणकवली नगरपंचायत लोकप्रतिनिधीची मुदत एप्रिल महिन्यामध्ये संपत आहे. या नगरपंचायत लोकप्रतिनिधीचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपणार आहे.कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह विद्यमान नगरसेवक लोक्रतिनिधींचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपणार असल्यामुळे निवडणूक लागणार की प्रशासक नेमणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन पातळीवर प्रलंबित असल्याने  निवडणुक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

कणकवली नगरपंचायत वर आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.गतवेळच्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाला आ.नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे बहुमत कणकवलीकरांनी दिले होते.त्यात नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ३७ मतांनी विजयी झाला तर सेना नेते संदेश पारकर यांचा पराभव झाला होता .गेल्या निवडणकीचा निकाल १२ एप्रिल २०१८ रोजी लागला होता.गेल्या निवडणुकीची धामधूम फेब्रुवारी पासूनच सूरु होती.मात्र,निवडणूक प्रशासकीय यंत्रणेची कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासक लागू होणार असल्याचे यंत्रणांकडून समजत आहे

आता ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण इतर मागास प्रवर्ग राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयात खटला प्रलंबित असल्यामुळे राज्यातील सर्वच निवडणुका थांबवण्यात आलेले आहेत. यापूर्वीच्या कालावधीतील जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपंचायत,नगरपालिका मध्ये प्रशासक आहेत.निवडणुका रखडलेल्या असतानाच कणकवली नगरपंचायत ची निवडणूक लागणार की, लांबणीवर पडणार याबाबत उत्सुकता कणकवलीकरांमध्ये आहे.एक तर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केल्यास मतदार यादी प्रसिद्ध,प्रभाग रचना आरक्षण आणि निवडणूक  यासाठी २ महिन्यांचा कालावधी लागतो. अजून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे.

कणकवली तालुका हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कणकवली नगरपंचायत ही निवडणूक विरोधकांकडून प्रतिष्ठेची केली जाते.सध्याच्या परिस्थितीत शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे.तसेच भाजपा व शिवसेना युती आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष विरुद्ध भाजप अशी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.त्या दृष्टीने दोन्ही गटांकडून या निवडणुकीकडे विशेष लक्ष देण्यात  येणार असल्याचे दिसत आहे