कणकवली वनविभाग गॅबियन बंधारे कधी घालणार ?

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 24, 2024 08:54 AM
views 241  views

कणकवली : कणकवली वन विभागाच्यावतीने जंगल पायथ्याशी असणाऱ्या विहिरींचा पाणीसाठा वाढावा व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि वन्य प्राण्यांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी गॅबियन बंधारे कधी घालणार असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. 

2021ते  22 मध्ये  अंदाजे दोन कोटी आणि 2022 ते 23 मध्ये दीड कोटी निधी कणकवली वनविभागाला  प्राप्त झाले होते.त्यामुळे कणकवली वैभववाडी मधील वेगवेगळ्या गावांमध्ये 50 पेक्षा जास्त गॅबियन बंधारे बांधण्यात आले व इतरही कामे  या निधीमधून करण्यात आले होते. पण 2023 ते 24 मध्ये अजून पर्यंत एकही बंधारा बांधण्यात आला नाही. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात हे बंधारे जंगलामधील वाहत्या पाण्यांवर व वहाळ यांच्यावर घालण्यात येतात मार्च सुरू होण्याला आला तरी देखील एकही बंदरा अजून बांधला नाही किंवा जनजागृती चे कोणतेही फलक वनविभागाकडून लावण्यात आले नसल्याने शेतकरी या वनविभागावर नाराजी व्यक्त करत आहेत.

प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी वनविभागाला यासंदर्भात विचारणा देखील केली आहे. तसेच कणकवली वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या विविध गावामध्ये वन्य प्राण्यांचा वावर असल्याने त्याबाबतची जनजागृती करणारे फलक देखील अजून वनविभागाच्यावतीने लावण्यात आले नाहीत. त्यामुळे कणकवली वनविभागाचे अधिकारी या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देणार का ?असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.