LIVE UPDATES

मोजणीला विरोध केल्याप्रकरणी उमेश वाळकेसह दोघे निर्दोष

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 30, 2025 21:14 PM
views 44  views

कणकवली : नगरपंचायतीच्या स्टेडिअमसाठीच्या आरक्षण नं. ५६ ची मोजणी करत असताना भूमि अभिलेखचे निमतानदार यांना मोजणीला विरोध केला. तसेच टेबल लावू न देता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जमिन मालक माजी नगरसेवक उमेश सहदेव वाळके व सोहम उमेश वाळके यांची ओरोस येथील अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे निमतानदार श्रीमती आर. एन. मठकर व त्यांचे कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी मनोज धुमाळे, अनंत कुबल, वन आणि कृषि विभागाचे कर्मचारी हे मुडेडोंगरी येथे नगरपंचायतीच्या स्टेडिअमकरीता आरक्षीत जमिनीची मोजणीसाठी आले होते. ही मोजणी येथील उपविभागिय अधिकारी यांच्याकडील भूसंपादन प्रस्तावानुसार प्रस्तावित होती. त्यावेळी जमिन मालकही उपस्थित होते.

जमिन मालकांपैकी उमेश व सोहम बाळके यांनी जमिन मोजणीला विरोध केला. टेबल लावले तर फेकून देऊ, सोबत आणलेला मसाला डोळ्यात टाकू अशी धमकी दिली व सरकारी काम करू दिले नाही. याप्रकरणी मनोज धुमाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३५३, १८६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. मोजणीपुर्वीच नगररचना विभाग पुणेचे संचालक यांनी स्टेडिअमचे आरक्षण दहा वर्षात अंमलात न आल्याने व्यपगत केले होते. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच साक्षीदारांच्या सालीतील तफावती, तपासातील त्रुटी यामुळे दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.