
कणकवली :कणकवली शहरांमध्ये सर्वपक्षीय राजकीय अड्डा म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहरातील चौकात मंगळवारी 'हाणामारी'चा प्रकार घडला. आर्थिक देवाणघेवाणीतून घडलेल्या या प्रकारात कुडाळ तालुक्यातील एका गावातील काहींनी थेट कणकवली गाठली, अन् शहरालगतच्या गावातील काहींसोबत वाद होत राडा झाला. यात काहींना 'प्रसाद' मिळाला, मात्र, दोन्हीकडील कार्यकर्ते एकाच पक्षाचे असल्याने एका तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याने मध्यस्थीकरत चौकातून त्यांना दुसरीकडे नेत या विषयावर पडदा टाकला. मात्र या राड्याची जोडीदार चर्चा कणकवली तालुक्यात सुरू होती या वादाचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत त्यामुळे याची पोलीस चौकशी होणार काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.
याबाबतची माहिती अशी की, कुडाळ तालुक्यातील एका सरकारी कामावर सुरक्षारक्षक म्हणून नोकरी लावण्यासाठी कणकवली तालुक्यातील या तरूणाने काही रक्कम ठरविली होती. संबंधीत तरूण अशाप्रकारे 'देवाणघेवाणी'तून अशा नोकऱ्या लावत असल्याचे सांगण्यात येते.विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यातील त्या कार्यकर्त्याला नोकरीला लावल्यानंतर त्या बदल्यात ठरलेली रक्कम हा तरूण मागत होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने गेले काही दिवस त्यांच्यात अंतर्गत धुसपुस सुरू होती.
दरम्यान, मंगळवारी हा विषय मिटविण्याच्या अनुषंगाने कुडाळमधील त्या तरूणाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी फोनवर दोघांमध्येही शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्यामुळे कुडाळहून येणाऱ्या तरूणाने सोबत काहींना आणले होते. तर तालुक्यातील हा तरूणही काही मित्रमंडळीला सांगून तयारीत होता. एकत्रित बसून निर्णय होण्याअगोदरच त्या राजकीय चौकात हे समोरासमोर येत वाद रंगला. काही वेळताच वाद वाढत जाऊन एकमेकांना जोरदार धक्काबुक्की करत प्रसादही देण्यात आला.
हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तालुकास्तरीय एका पदाधिकाऱ्याने आक्रमक भूमिका घेत सर्वांना चौकातून उठवून दुसरीकडे नेले. तेथे ठराविकजणांनाच सोबत घेत या वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या साऱ्यातून अशाप्रकारे सरकारी कामांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नेमकी कुणाकडून होते, नियुक्तीसाठी मध्यस्थींतकडून होणाऱ्या डिलींगमध्ये अधिकारीही असतात का? या व अशा चर्चाना उत आला असून याची देखील चौकशी होणार काय असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारत आहेत