
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे येथे २६ नोव्हेंबर कार्तिक एकादशी ते २ डिसेंबर देव दिवाळी पर्यत श्री देव काळभैरवाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून यानिमित्त पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी व पालखी सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिंदळे गावात नयनरम्य परिसरात काळभैरवाचे ऐतिहासिक मंदिर आहे.या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने संपूर्ण देशात हे मंदिर आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते, पर्यटक आणि शिवभक्त नेहमीच येथे दर्शनासाठी येत असतात. काळभैरव हे हिंदळेचे ग्रामदैवत आहे. देवगड मालवण सागरी मार्गावर हिंदळे येथे हे ऐतिहासिक मंदिर आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आणि अन्नपूर्णा नदीचा संगम आहे, माड फोफळी आणि आंबा बागायतीं डोगरावर रान मेवा आदी निसर्ग सौंदर्याने येथील परिसर सर्वांना भुरळ घालतो, या ठिकाणी तथाकथित या दूरदर्शनच्या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले होते.
देवदिवाळीला या मंदिरात मोठी जत्रा भरते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघतो तर शिवभक्तांची ही प्रचंड गर्दी या निमित्ताने होत असते. नवसाला पावणारे व हाकेला धावून जाणारे असा महिमा या काळभैरव देवस्थानाचा आहे.