
सावंतवाडी : कलंबिस्त मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला मागील मे महिन्यात सुरुवात झाली होती. मात्र, ठेकेदाराने केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडले आणि त्यानंतर तो रस्त्याकडे फिरकलेलाही नाही. या संदर्भात गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, प्रत्यक्ष भेट घेतल्या आणि लेखी निवेदने दिली. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही.
या अपूर्ण रस्त्यामुळे शिरसिंगे, वेर्ले, कलंबिस्त आणि सावरवाड या गावातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर नाराजी व्यक्त केली असून, त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. जर लवकरच योग्य पावले उचलली नाहीत, तर याचा अधिक तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.