काजू बी ला 200रुपये हमीभाव द्या ; सिंधुदुर्गात होणार धरणे आंदोलन

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 24, 2024 11:31 AM
views 457  views

सिंधुदुर्ग : आयात काजू मुळे बाजार भाव कोसळल्या मुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दराची ३-४ वर्षात ३०० रुपये पासून ८०/९० रुपये पर्यंत घसरण झाली आहे. अनेकांचे बजेट कोलमडत आहे. आंदोलने करणे, दबाव वाढवणे या मार्गाने दर टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक २०० रुपये हमी भाव करणे आवश्यक झाले आहे. या मागणी साठी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात तहसील कार्यालयावर धरणे कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन  शेती विषयक संघटनांच्या पत्रकार परिषदेत केले. गोपुरी आश्रम या ठिकाणी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी श्रमिक चे सुनील निचम, अतुल दिघे, शांताराम पाटील,  विलास सावंत, व्ही के सावंत, नितीन म्हावळणकर, पंकज दळी, संदीप राणे, आदर्श मोरोजकर आदी उपस्थित होते. 

गोवा सरकारने काजू बिया ना रुपये १५० हमीभाव जाहीर केला आहे. दापोली विद्यापीठाने काजू उत्पादनाचा खर्च १२९ रुपये प्रती किलो आहे असे अभ्यासानंतर सांगितले आहे. अशा स्थितीत स्वामिनाथा अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव १९३ रुपये आहे. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता शेतकर्याना २०० रुपये भाव मिळावा ही अत्यंत रास्त भूमिका आहे.

महाराष्ट्र सरकारने जागोजागी काजू खरेदी केंद्रे उभारून काजू खरेदी केला पाहिजे. कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यात काजू झाडे आहेत. महाराष्ट्रात या पट्ट्यात पिकणारा काजू गुणवत्तापूर्ण व चवीला चांगला आहे. त्याला चोखंदळ गिरहाइकाची पसंती आहे. परंतु आयात शुल्क शासनाने घटवल्यामुळे आयात काजूचा पूर असून यामध्ये कडील शेतकरी हवालदिल होत आहे. काजू पिकच नष्ट होईल अशी परिस्थिती तयार झाली आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली. सरकार चे आता शेतकऱ्या पेक्षा व्यापारी वर्गाकडे लक्ष अधिक आहे. व्यापारी मालामाल व शेतकरी कंगाल अशी स्थिति निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काजू लागवडीवर मोठा परिणाम झालाय, यामुळे नर्सरी व्यवसाय पण धोक्यात आलाय. या आंदोलनात गिरणी कामगार देखील सहभागी होणार.