
ऑनलाईन प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष ; विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : अच्युत भोसले
सावंतवाडी : शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले जाणारे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल यंदा ११ वी ज्युनियर कॉलेज सुरु करत आहे. शहरानजीक महादेव भाटले येथील प्रशालेत यंदापासून विज्ञान शाखेचं शिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि वैज्ञानिक विचारांना पोषक वातावरण इथे उपलब्ध आहे अशी माहिती भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली. यासाठीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशकर्त्या सर्व विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन केला आहे. भोसले कॉलेजसह इतरही ठिकाणी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रक्रीयेदरम्यान अडचण भासल्यास YBIS कॉलेजच्या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. भोसले यांनी केले आहे.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. भोसले यांनी नव्यानं सुरु झालेल्या ज्युनियर कॉलेज विषयी माहिती दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्या प्रियांका देसाई आदी उपस्थित होते. श्री. भोसले पुढे म्हणाले, यशवंतराव भोसले स्कूलनं गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्तम कामगिरी केली. याचाच पुढील टप्पा म्हणून जून-२०२५ पासून ज्युनियर कॉलेज आम्ही सुरु करत आहोत. हे कॉलेज महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ (HSC Board) यांच्याशी संलग्न आहे. YBIS ज्युनिअर कॉलेज हे सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी शिक्षणासाठी कटीबद्ध आहे. इतर शाखांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, जिज्ञासूपणा, कौशल्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा, भविष्यातील उच्च शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान शाखा आम्ही सुरू करत आहोत.
पुढील वर्षापासून १२ वी देखील असणार आहे. ८० विद्यार्थांना प्रवेश उपलब्ध मिळणार असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित,जीवशास्त्र, संगणक आदी विषय प्रशालेत उपलब्ध आहेत. विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित तज्ञ प्राध्यापक, प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. NEET, JEE इ. स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. जिज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. विज्ञान अभ्यासक्रम आणि उत्साही शैक्षणिक वातावरणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याचा लाभ घ्यावा. ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यानं विद्यार्थी, पालकांच्या हितासाठी कॉलेजमध्ये मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहीती श्री.भोसले यांनी दिली.