पत्रकारांनी केली महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड..!

Edited by:
Published on: July 01, 2023 17:34 PM
views 303  views

कणकवली :  विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शनिवारी 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे महामार्गाच्या दुतर्फा विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात आली. महामार्ग चौपदरीकरणात महामार्गाच्या बाजुची अनेक झाडे तोडल्याने दुतर्फा पुन्हा एकदा वृक्ष लागवडीची गरज लक्षात घेवून सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली तालुका पत्रकार समितीने हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर व अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुक करत पत्रकार समितीचा हा उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.

शनिवारी सकाळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे खारेपाटण उपविभागाचे उपअभियंता अतुल शिवनिवार, शाखा अभियंता डी. जी. कुमावत, कणकवली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष पवार, वनपाल सत्यवान सुतार,  जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, अशोक करंबेळकर, भाई चव्हाण, दिलीप हिंदळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, खजिनदार योगेश गोडवे, सहसचिव उत्तम सावंत, कार्यकारिणी सदस्य भास्कर रासम, उमेश बुचडे, तुषार हजारे, पत्रकार लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, भगवान लोके,नितीन कदम, सचिन राणे, गुरूप्रसाद सावंत, संजय राणे, विनोद जाधव, प्रदीप राणे, दर्शन सावंत, मोहन पडवळ तसेच सावडाव माजी सरपंच परशुराम झगडे, जानवली ग्रामसेविका अर्चना लाड, वनरक्षक श्री. गळवे, पूजा चव्हाण, केसीसी बिल्डकॉनचे रणविजय सिंग, वनसहाय्यक श्री. गुडेकर, श्री. तांबे आदी उपस्थित होते. 

मान्यवर अधिकार्‍यांसह सर्वच पत्रकार मित्रांनी वृक्षारोपण केले. या वृक्षारोपणात काजू, आंबा, जांभूळ, शिवण, करंज, आवळा, आपटा, सोनबहावा आदी विविध प्रजातींची सुमारे 50 हून अधिक रोपे महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आली. पत्रकार समितीच्या या उपक्रमाला कणकवली वनविभाग व महामार्ग प्राधिकरण खारेपाटण उपविभाग यांचे सहकार्य लाभले. या लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्याचा निर्धार पत्रकार समितीच्यावतीने सर्वच सदस्यांनी केला. कणकवली तालुका पत्रकार समितीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.