
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येणारा पत्रकार दिन ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दीन म्हणून साजरा केला जातो.त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला तर त्यांनी दर्पण हे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.त्यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या पत्रकार दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. यावर्षीचा पहिलाच पत्रकार दिन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग नगरी येथे बांधण्यात आलेले स्मारक व पत्रकार भवन या ठिकाणी होणार आहे. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारे जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारांचे वितरण हे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून पोलीस आयुक्त रेल्वे प्रशासन रवींद्र शिसवे, दैनिक लोकमत कोल्हापूर चे संपादक वसंत भोसले हे पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.