वेंगुर्ल्यात वर्षारंभी संयुक्त योगोपचार शिबीराचे उद्घाटन

Edited by: दिपेश परब
Published on: March 31, 2025 14:49 PM
views 266  views

वेंगुर्ला : पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत वेंगुर्ला येथे रविवार दि ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ६ वाजता संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिराला उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे आणि अध्यक्ष म्हणून पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर उपस्थित होते. तसेच यावेळी किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी अनिल मेस्त्री, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी नारायण सावंत, सिद्धिविनायक मंगल कार्यालयाचे मालक दिलीप मालवणकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी जवळपास 60 योगसाधकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कुंभार, प्रास्ताविक प्रशांत केरवडेकर व आभार प्रदर्शन रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. या शिबिरास वेंगुर्लामधील योगाभ्यास प्रेमींनी, तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला. 

सिद्धिविनायक मंगल कार्यालयाचे मालक दिलीप मालवणकर यांनी  सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीलाच आपण आपणालाच सुंदर असे गिफ्ट देऊया आणि ते म्हणजे आपले रोगमुक्त शरीर असा संकल्प आज योग वर्गात घेण्यात आला तसेच शिबिर चालू असे पर्यंत संपूर्ण वेंगुर्ला मधील जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष शेखर बांदेकर यांनी सांगितले.