जितेंद्र आव्हाडांचं 'ते' वक्तव्य संतापजनक : ॲड. संजू शिरोडकर

Edited by:
Published on: January 05, 2024 12:22 PM
views 102  views

सावंतवाडी : आपली वोटबँक सांभाळण्यासाठी व ठराविक मतदारांना खुश करण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे केवळ अतिशय संतापजनक आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाने जो आहार घेतला तो फळे आणि कंदमुळे. याचे अनेक दाखले भावार्थ रामायणात आहेत. असे असताना आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह असून आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे सावंतवाडी माजी शहर अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी केली आहे.

”राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलत असताना उपस्थित केला होता.त्यांच्या या वक्तव्याचा ॲड. संजू शिरोडकर यांनी जाहिर निषेध केला आहे. आव्हाडांनी कोणतेही वक्तव्य करताना आधी अभ्यास करावा.

भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय १६ वा यात श्रीराम वनवासाला गेल्यानंतर मागे त्यांचे वडील दशरथाचा मृत्यू झाला. तेव्हा वडिलांच्या मृत्यूची वार्ता आपल्या बंधूंना सांगण्याकरिता भरत रामाचा वनवासात ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी गेले . तेव्हा ज्येष्ठ पुत्र या नात्याने रामाच्या हातून वडिलांचे पिंडदान करणे गरजेचे होते. त्या पिंडदानाकरिता तीळ, तांदूळ इत्यादी सामग्री भरताने आयोध्येतून नेली होती; मात्र त्या सामग्रीने श्रीरामाने पिंड दिला नाही . कारण आपण जे अन्न खातो त्याच सामग्रीचा पिंड पितरांकरता द्यावा हा नियम श्रीरामाने तिथे सांगितला. वनवासात मी अन्न सेवन करत नसून फळे आणि कंदमुळेच खातोय , तेव्हा त्याप्रसंगी तीळ तांदूळ यांना बाजूला सारून आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ फळ आणि कंदमुळे यांचाच पिंड श्रीरामाने दिल्याचा उल्लेख भावार्थ रामायणात सापडतो, असा संदर्भही ॲड. शिरोडकर यांनी दिला आहे. त्यामुळेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या बाबतीत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध असून त्यांनी अशी वक्तव्य करण्याआधी हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. केवळ विशिष्ट समाजाच्या मतांचा विचार करून अशी प्रक्षोभक वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.