
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर एका व्यावसायिकाने केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तरच्या तासात घेऊन सरकारला चांगलेच धारेवर धरले.
माजी मंत्री जयंत पाटील या अतिक्रमणावर बोलताना म्हणाले की, माणगाव ग्रामपंचायतचा हा रस्ता फार जुना असून त्यावर अतिक्रमण करून एका व्यावसायिकाने बांधकाम केले आहे. या अनाधिकृत बांधकामामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे हे सांगताना राज्यभरात असे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. धनदांडगे लोक आपली हुकुमशाही दाखवून असे प्रकार करतात. दमदाटी केली की त्यांवर प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई होत नाही. गरीब जनतेच्या अडचणींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन रस्ता नियमाप्रमाणे वाहतुकीस उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन सभागृहात दिले.