जय किसान ग्रुपचे भात लागवडीचे प्रात्यक्षिक

Edited by: मनोज पवार
Published on: June 28, 2025 11:56 AM
views 91  views

चिपळूण : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील जय किसान ग्रुपच्या कृषी दूतांनी रामपूर(पाथर्डी) गावात अभिनव कृषी उपक्रम राबवला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत, या कृषीदूतांनी अनिल दत्ताराम रेडीज यांच्या भातशेतीत चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक केले.

या प्रात्यक्षिकादरम्यान, भात लागवडीसाठी गिरीपुष्प पाला आणि युरिया ब्रिकेटचा नियंत्रित वापर करण्यात आला, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो. यासोबतच, भात शेती यांत्रिकीकरणाचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले, ज्यामुळे वेळ आणि मनुष्यबळाची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट केवळ नवीन लागवड पद्धती दाखवणे नव्हते, तर शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती देणे हे देखील होते.