'जागर सिंधुरत्नांचा’ ; मठ येथे व्याख्यान

Edited by:
Published on: January 08, 2026 14:11 PM
views 61  views

वेंगुर्ले : "आपण ज्यांच्या नावाने ही शाळा ओळखतो ते रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्म मठ गावात २४ डिसेंबर १८५० रोजी झाला. इंग्रजी राजवटीत त्यांनी आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतले आणि फाळणीपूर्वी क्वेटा येथे वैद्यकीय सेवा बजावली. इंग्रजी, संस्कृत, उर्दू व पश्तू अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दर दोन वर्षांनी न चुकता ते मठ गावी येत असत. त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने येथील शाळेसाठी आपली जमीन दान केली. त्यामुळे त्यांचे कार्य समजून घेणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ओळख सिंधुरत्नांची’ या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान मठ येथे गुंफताना ते बोलत होते.

डॉ. लळीत पुढे म्हणाले की, शालेय अभ्यासक्रम शिकत असतानाच आपल्या परिसरातील व जिल्ह्यातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आदर्श व प्रेरणा मिळते. याच उद्देशाने गेली चार–पाच वर्षे आपण ‘सिंधुदुर्गातील माणिकमोती’ या विषयावर संशोधन व लेखन करीत आहोत.

मठ गावचे रायसाहेब रामजी खानोलकर यांचे चिरंजीव, भारतीय पॅथॉलॉजीचे जनक पद्मभूषण डॉ. वसंतराव खानोलकर यांचे कार्यही अत्यंत महान असून, ते ‘सिंधुरत्ने’ या लेखमालेतून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रशाळा मुख्याध्यापक तांबे व सहकारी शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. “आगामी काळात प्रत्येक माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात ‘ओळख सिंधुरत्नांची’ ही व्याख्याने अखंडपणे दिली जातील. वर्षअखेरीस त्यावर आधारित ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेऊन हजारो रुपयांची पारितोषिके दिली जातील,” अशी माहिती देत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शके १३१७ सालच्या मठ गावातील ‘मांगल्याचा मठ’ येथील शिलालेखाची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील जाधव, श्री. गोसावी, सौ. सावंत, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब मठकर, मिलिंद खानोलकर आदी उपस्थित होते. श्री. गोसावी यांनी डॉ. बाळकृष्ण लळीत यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या समूह प्रार्थना गीताने झाली.