मालवणी मुलूखाच्या साहित्य चळवळीचा 'साक्षीदार' !

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर
Edited by: विनायक गांवस
Published on: July 19, 2024 12:21 PM
views 288  views

कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष मालिका सुरु करण्यात आली होती. साहित्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या तब्बल ४० साहित्यिकांच्या मुलाखती त्यामध्ये घेण्यात आल्यात. अखंडीतपणे दर रविवारी या मुलाखती प्रकाशित करण्यात आल्या असून दैनिक कोकणसादच्या वर्धापन दिनी कोकणच्या साहित्य चळवळीचा 'साक्षीदार' असणाऱ्या साहित्यिकाशी खास संवाद साधला आहे. त्यांच्या 'मालवणी मुलूखालील 'प्रयोगात्म लोककला' या संशोधन प्रबंधाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार, रावबहादूर बांबर्डेकर पुरस्कार व पद्‌मश्री भाऊसाहेब पुरस्कार असे तीन मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत.'दशावतार', ' चित्रकथी, लळीत' अशी त्यांची तीन पुस्तकेही प्रकाशित झालीत. 'झिनझिनाट' हा मालवणी कविता संग्रह आणि ९ मराठी कविता संग्रह, २ कादंबऱ्या, १ कथासंग्रह, २ नाटके तसेच आस्वादक समीक्षा, ललित गद्य, बालसाहित्य, अनुवाद, संपादने त्यांनी केलीत. विंदा करंदीकर यांच्या चरित्रग्रंथाचे लेखक, 'वेलनोन ब्रॉडकास्टर' म्हणून ख्याती असलेले रेडिओ प्रॉडक्शन्ससाठी राष्ट्रीय स्तरावरावरील आकाशवाणी अॅन्युअल अॅवार्ड, रापा अॅवार्ड आणि आवा अॅवार्ड असे तीन सन्मान प्राप्त, दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांच्याशी 'कोकणसाद'चे संपादक संदीप देसाई यांनी 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा' या सदराच्या शेवटच्या पुष्पात साधलेला हा संवाद.

'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा' !

पुष्प : समारोपाचं


महेश केळुसकर ते डॉक्टर महेश केळुसकर हा प्रवास कसा होता ?

माझा जन्म कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे झाला. इथला मध सगळ्या दुनियेत प्रसिद्ध आहे. जून महिन्यात माझा जन्म झाला, पावसाचे दिवस होते. माझ्या बालपणीचं गाव आता आहे तसंच होत. गावात लाईटही नव्हती. फारशा सुधारणा अजूनही  झालेल्या नाही. आमची जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा चांगली होती. गुरूजी चांगले होते. आमच घर म्हणजे शेतमांगर होता. आम्ही सहा भावंडं कंदिलावर अभ्यास करायचो. एका कंदिलाच्या प्रकाशात आम्ही अभ्यास करायचो. पुढच्या दोन बहीणी व मागची तीन भावंडे होती. वडील शेती करायचे, कुटीर उद्योग होते. आई विड्या वळण्याच काम करायची. त्या विड्या बाजारात व्यापारी वर्गापर्यंत मी नेऊन पोहचवायचो. फोंडाघाट बस स्थानकावर मी केळी विकली आहेत. मच्छीमार्केटमध्ये मासे देखील विकलेत. ''तेव्हा तुमका काय धंदे लागलेत. तुम्ही मासे विकुचे लोकं आसात ?'' असं लोक म्हणायचे. कुठल्याही श्रमाचं काम करताना लाज बाळगायची नाही हा संस्कार माझ्यावर पहिल्यांदा झाला. आमचे मास्तर अ.ला.सावंत, सहदेव कातकर गुरूजी होते. ते ज्या आवाजात कविता सादर करायचे, गद्य देखील सादर करायचे. यातूनच नकळत संस्कार माझ्यावर झाले. त्यांनी सादर केलेल्या कवितेवेळी अंगावर रोमांच उभे राहायचे‌. त्यांचा आवाज आजही माझ्या कानी घुमत आहे. त्यांच्या सादरीकरणात ताकद होती. मराठी शाळेत आमच्यावर संस्कार झाले. या संस्कारातून मी घडत गेलो अन् सावंतवाडीला पोहचलो. तिथे मला बोट धरून वाट दाखवणारे गुरू कवीवर्य डॉ. वसंत सावंत भेटले. ते देखील आमच्या फोंड्याचे‌‌. त्यांनी मला हेरल, तिथून माझा प्रवास सुरू झाला. 

साहित्याकडे कसे वळला, डॉ. वसंत सावंत यांच्या सहवासाविषयी काय सांगाल ?

नववी ते अकरावी मी राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये होतो. तिकडे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकविणारे विद्वान शिक्षक होते. कॉलेजला प्रा. डॉ. वसंत सावंत सर शिकवायला होते. परंतु, आरपीडीसमोरच मोती तलाव, सुरंगीच झाड होतं. शिक्षकांची शिस्त ही होती. खेळताना शाळेच्या काचा फोडण्याचे उद्योग देखील आम्ही केलेत. मराठी भाषा शिकण्याचे धडे मला तिथे मिळाले. यानंतर श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमध्ये मी गेलो. जुनी अकरावी माझी होती‌. चांगले गुण मिळाल्यानं विज्ञान शाखेचा अर्ज घरी आणलेला. परंतु, भाषेची आवड असल्यानं तो फाडून टाकला अन् कला शाखेत प्रवेश घेतला. तिथे वसंत सावंत सरांनी जे ज्ञान दिलं ते शब्दांत सांगता येणार नाही. कविता अन् मराठी साहित्य याची जाणीव त्यांनी करून दिली. दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ सावंतवाडी ज्याचं नाव आता सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संघ सावंतवाडी आहे. प्रा. प्रवीण बांदेकर व‌ साहित्यिक मंडळी त्याच काम बघत आहेत. त्यावेळी या साहित्य संघाचे प्रा. वसंत सावंत अध्यक्ष, प्रा.एच.व्ही. देशपांडे कार्याध्यक्ष, प्रा.टी.एन. नाईक उपाध्यक्ष व मी सेक्रेटरी. वयाच्या १९ व्या वर्षी संस्थात्मक कामाला सुरुवात केली. साहित्य संघाची घटना माझ्या हस्ताक्षरात आहे. त्या साहित्य संस्थेनं आपल्या मालवणी मुलूखामध्ये साहित्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. साहित्य संघापूर्वी काही नव्हतं. आमची टीम खूप चांगली होती. त्याकाळी भरपूर फिरलो, साहित्यिक कार्यक्रम केले‌. 


सावंतवाडीच्या कोजागरी साहित्य संमेलनातील पहिल्या मालवणी कवितेच्या आठवणी काय आहेत ?

कविश्रेष्ठ बाकीबाब बोरकरांना आम्ही आबा बोरकर म्हणायचो. १९७८ साली सावंतवाडीत झालेल्या कोजागरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मी त्यावेळी एक कार्यकर्ता होतो. आरपीडीच्या डोलकाठीवर आम्ही कवी संमेलन घ्यायचो. अचानक माझ नाव घेतलं गेलं. त्यावेळी 'बाळगो नि मालग्या' ही कविता मी सादर केली. व्यासपीठावरून खाली उतरलो अन् आबांनी परत बोलावलं. ही कविता पुन्हा सादर करायला सांगितली. यावेळी ते म्हणाले, हा पुढे कवी होणार आहे व पाठीवर थाप मारली. दिव्यत्वाचा स्पर्श मला तिथे झाला. पुढे वसंत सावंत सर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला घेऊन जायचे. किमान दोन कविता मला ते सादर करायला सांगायचे. 


विविध साहित्य प्रकार तुम्ही हाताळलेत. कोकण दर्शनाचा एक विस्तृत पट मराठी साहित्यात आला असं तुम्हाला वाटतं का ?

माझ्याआधी कोकणातून मोठंमोठे साहित्यिक होऊन गेले. मामा वरेरकर, जयवंत दळवी, आरती प्रभू, मंगेश पाडगांवकर, पोंभुर्लेचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विं.दा. करंदीकर त्यांच चरित्र मी लिहील आहे. या सर्वांच साहित्य मला वाढत्या वयात वाचायला मिळालं. आना पेडणेकर यांनी मालवणी किनाऱ्यावरच जीवन समोर आणलं. बालपण व तारुण्य मालवणी मुलूखात गेल्यानं माझ्यावरती नकळत संस्कार झाले. माझ्या लेखनातून ते येत गेले. ललीत गद्याच 'घेऊ चंद्र उशाला' यात मालवणी मुलूखावर लेख आहेत. 'व्हय महाराजा'त मालवणी गाऱ्हाणं, मालवणी बोलीतून गद्य लेखन केलं आहे. 'झिनझिनाट' या काव्यसंग्रहात मालवणी कविता आहेत. माझ्या साहित्यात मालवणी खूणा आढळणार, कोकण दर्शन घडणार. बदलतं कोकण माझ्या कादंबरी, कथा, नाटकातून दाखवलं आहे. नवीन घडणाऱ्या गोष्टी शब्दांत पकडता आल्या पाहिजेत. नव‌ साहित्यिकांनी त्यावर लेखन करावं. कोकण दर्शनातून कोकणी माणसाच्या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. कोकणी माणूस आळशी नाही. साहित्य, कला क्षेत्रात कोकणी माणसान ताकद निर्माण केली आहे. ही वज्रमूठ कायम राहिली पाहिजे. कोकण हे आता जागतिक स्तरावर पोहचलं आहे. कोकणची ताकद खूप मोठ्या प्रमाणात कोकण दर्शन घडवणारी आहे. 

'रेडीओ'साठीचा तुमचा एक मजेशीर किस्सा आहे. तो ऐकायला आवडेल.

त्याकाळी मोबाईल वगैरे नव्हते. त्यामुळे रोज पोस्टात जायचो आणि नोकरीसाठी अर्ज करायचो. आईला पान खायची सवय होती. त्यामुळे पोस्टाच्या कोपऱ्यावर एक पानवाला होता त्याच्याकडे मी जायचो. त्या पानाच्या ठेल्यावर निवेदन ऐकू आलं की ''रत्नागिरी केंद्रावर निर्मीती सहाय्यक हवे आहेत''. ते ऐकलं आणि पोस्टात अर्ज टाकाला. नंतर वाट बघत राहिलो कारण त्या पदासाठी मी परिपूर्ण होतो. पण, सगळी वशिल्याची काम म्हणून मी घरी येऊन आंब्याच्या पेट्या भरत बसलेलो. त्यावेळी रत्नागिरी केंद्रातून मुलाखतीसाठी मला कॉल आला. ६५ उमेदवार २ जागांसाठी होते. 'रेडीओ' म्हणजे एक स्वप्न होतं. माझे कार्यक्रम रेडिओवर झाले होते. पण, नोकरी वगैरे असं स्वप्नात देखील वाटल नव्हत. पान घ्यायला गेलो नसतो तर ती जाहिरात मी ऐकली नसती. हा एक योगायोग होता‌. मुलाखतीनंतर सहा महिने उत्तर आलं नाही. एकेदिवशी कामावर रूजू होण्यासाठी पत्र आलं. रत्नागिरी केंद्रावर निर्मिती सहाय्यक म्हणून मी हजर झालो. ९० नंतर युपीएससीची परिक्षा देऊन प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह झालो. नंतर मुंबईला माझी नेमणूक झाली. ही नेमणूक करू नये म्हणून मी सांगितली. मुंबईची मला भिती वाटते असं सांगितलं. मात्र, ते काही ऐकले नाही. मला तिकडे जाव‌ लागलं. एका चाळीत आम्ही राहू लागलो. सुरूवातीला अनेक ट्रेन मी सोडून द्यायला लागलो. त्यामुळे मिटींगला उशीर होऊ लागला. लोकांमुळे आपोआप ट्रेनमध्ये ढकलला जाऊ लागलो. साडे छत्तीस वर्ष आकाशवाणीवत विविध केंद्रावर मी काम केल. श्रोत्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास सुखकर झाला. प्रामाणिकपणे काम केलं की चांगल फळ मिळतं.


कोकणातील लोककलांवर आपण संशोधन प्रबंध लिहिले.  मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली. काय सांगू इच्छिता ?

माझ्या वडिलांना नाटकांची फार आवड होती. लहानपणी मला ते फरफटत घेऊन जायचे. दशावतारी नाटक जत्रेत व्हायची. त्यामुळे लहानपणीच दशावतार मनात ठासलेला होता. पिंगूळीला चित्रकथी बघितली‌, लळीत पाहिली. या लोककलांवर संशोधन प्रबंध लिहिलायच ठरवलं. माझा प्रबंध बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केला आहे. नंतर दशावतार, चित्रकथी व लळीत ही पुस्तकं लिहीली‌. ९५ साली मला पीएचडी मिळाली. दशावताराच काम करताना नेरूरच्या बाबी कलिंगण यांच्या घरी गेलो. त्यांच्या घराच्या दर्शनी भागाच्या चौकटीवर बॅ. नाथ पैंचा फोटो होता. यावेळी त्यांनी मी या फोटोबद्दल विचारलं. यावेळी ते म्हणाले, ''ह्योच आमचो गणपती. हेंचामुळे आमचो दशावतार पुढे इलो. संसदेत पहिल्यांदा दशावतारांचो आवाज उठयल्यानी. नायतर दशावतार केव्हाचो मेल्लो'' हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कोकणी माणसांची कृतज्ञता बाबींच्या रूपानं पाहिली. म्हणून माझं संशोधन नाथ पैंच्या स्मृतीस अर्पण केली.


गद्य लेखनास मालवणी सक्षम वाटते का ?

मराठीच्या ६८ बोली आहेत. त्यातील मालवणी बोली ताकदवान आहे. आपली आहे म्हणून सांगत नाही. मालवणीत कथा, कादंबरी, बालसाहित्य तुम्ही लिहू शकता. दादा मडकईकर हे माझे समकालीन. माझं मालवणी गीत, गाऱ्हाणं देखील खूप गाजलं आहे. 'व्हय म्हाराजा' मध्ये हे मालवणी गाऱ्हाणं आहे. मालवणी भाषेत वेगळी ताकद आहे. ऐकताना, वाचताना सजगपणे वाचाव. २० मिनीटं गाऱ्हाणं घालणारी माणसं आपल्या कोकणात आहेत. ते ऐकलेले आम्ही आहोत. ते सादर करण्याच काम करतो. माझ्या कवितेत निसर्ग, प्रेम, मालवणी माणूस, राजकारण आदी सर्व आलं आहे. 


कोकणातील दिग्गजांसोबतचा ५० वर्षांचा साहित्य प्रवास कसा होता ?

सावंतवाडीतील कोजागरी कवी संमेलनात वसंत सावंत सर महाराष्ट्रातील मोठ्या कवीला सावंतवाडीत आमंत्रित करायचे. मी सोबतच असल्याने संमेलना आधीच्या, नंतरच्या त्यांच्या गप्पा. त्यांचा सहवास मला मिळायचा. विठ्ठल मंदिरात विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर व वसंत बापट यांचा काव्य दर्शन हा कार्यक्रम झाला होता. त्यांचे विचार मला आयते मिळत होते. त्यासाठी बाहेर जावं लागतं नव्हतं. वसंत सावंत सरांमुळे विठ्ठल वाघ, दया पवार, आनंद यादव, रामदास फुटाणे, नारायण सुर्वे असे मोठमोठे साहित्यिक मी ऐकले. त्यांच्यासोबत संवाद साधला. चांगले लोक आयुष्यात भेटल्यानं चांगली वाट मिळते. रणजित देसाई यांनी देखील माझ्या 'बाळगो नि मालग्या' कविता सादर करायला सांगितली. त्यांच्याकडून मिळालेला हा एक पुरस्कारच होता.‌ रमेश तेंडुलकर, मंगेश पाडगावकर यांचाही सहवास कवी संमेलनात लाभला.  जिल्ह्यातील साहित्यिकांना भेटायचो, त्यांच्याशी संवाद साधायचो. मराठी साहित्यात खूप काही घडत आहे. नव साहित्यिकांनी श्रवण केलं पाहिजे. दुसऱ्याचही ऐकलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. वाचना शिवाय शहाणपण येतं नाही. पाय जमिनीवर असले पाहिजे. एकमेकांना भेटून संवाद साधला पाहिजे. 


''माझ्या साहित्याची मूळं मालवणी मुलखात आहेत''असं आपण सांगता. त्याविषयीचं मत ?

कोकणात नविन काय घडत आहे ? ते बदल टिपण्याच काम मी करतो. बदलत्या कोकणात काय घडत आहे ? कोकणचा संघर्ष बिनधास्त आला पाहिजे. लिहीताना आपलं मूळं मालवणी मुलखात आहे हे विसरून चालणार नाही. 'झिनझिनाट' ही कविता किनाट काळोखात उमगली. कविता जन्मत असताना जन्मदात्री बेहोश असते याप्रमाणे कवीची अवस्था असते. आजवर हजारोवेळा देशासह जगभरात ही कविता मी सादर केली. ही मालवणी कविता आता विविध बोलींमध्ये भाषांतरीत होत आहे. 


छाया : साहिल बागवे 

शब्दांकन : विनायक गांवस