ग्रामसेवकांची हजेरी बायोमेट्रिक घेणे बंधनकारक

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या मागणीची दखल
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 19, 2024 15:07 PM
views 653  views

सिंधुदुर्गनगरी : बहुतांश ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत, वारंवार मिटिंगच्या नावाखाली ग्रामपंचायत कार्यालयांत गायब राहणे, दुपारनंतर कार्यालयीन कामकाज सोडून इतरत्र हिंडणे असे काहीसे जिल्ह्यात बहुतांश गावात दिसणारे चित्र पाहता सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना कृती समितीमार्फत अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ग्रामविकास विभागाकडे ग्रामसेवकांच्या बेशिस्त वर्तनाला आळा घालण्यासाठी उपपाययोजना करणेची पत्राद्वारे विनंती केली होती.

त्यात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करणे, ग्रामपंचायत कार्यालयात हालचाल नोंदवही राखणे, पंचायत समिती स्तरावर ग्रामसेवकांसाठी व्हिजिट नोंदवही ठेवणे, मुख्यालयी राहत असलेबाबत दरमहा शपथपत्र घेणे, पंचायत समिती स्तरावर होणाऱ्या बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स प्रणालीने घेणे अशा मागण्या ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिववांकडे  पत्राद्वारे केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत ग्रामविकास विभागाने ग्रामविकास ग्रामसेवकांची जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत सूचना राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. ग्रामसेवकांच्या बेशिस्त वर्तन व कामचुकारपणाला आळा बसणार असल्याची माहिती शिवसेना कामगार नेते सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.