माणगावात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना जनजागृती कार्यक्रम संपन्न

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व कोकण संस्थेचे आयोजन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 20, 2025 18:51 PM
views 19  views

माणगाव : जिल्हा महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिंधुदुर्ग आणि विशेष दत्तक संस्था कोकण कला व शिक्षण विकास संस्था तसेच भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने  आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत माणगाव येथे दत्तक योजनेबाबत समाजात जागरूकता व्हावी या उद्देशाने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी संरक्षण अधिकारी बिगर संस्थात्मक काळजी विभागाच्या मा. श्रीम. दीपिका सावंत मॅडम, प्रमुख मार्गदर्शक श्री. राजकुमार ससपाडे सर, सामाजिक कार्यकर्ता श्री. सतिश कांबळी, श्री. आचल कांबळी, अंगणवाडी सेविका घाडीगावकर मॅडम, कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रथमेश सावंत, श्री. रामजी शिरसाट, श्री. शुभम लोणाग्रे, श्रीम. गौरी आडेलकर, श्रीम.रुचा पेडणेकर, श्रीम.वैष्णवी म्हाडगुत, आरोग्य सेविका  एस. एस. सातार्डेकर, श्रीम. कोंडसकर, श्रीम. तृप्ती गोडे, पोलिस पाटील श्रीम. आदिती देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली 14 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये सातत्याने काम करत असताना जिल्हा महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग मार्फत विशेष दत्तक संस्था म्हणून विनाअनुदानित तत्वावर कोकण कला व शिक्षण विकास संस्था कार्यरत आहे. या उपक्रमामध्ये कोकण संस्थेच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. या वर्षी विशेष दत्तक योजना व त्याची गरज हा ह्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. पालकत्वाची इच्छा असलेल्या जोडप्यांना योग्य माहिती करून देणे, बालकांचे हक्क, सुरक्षा आणि संगोपनाबाबत मार्गदर्शन, खास दत्तक केंद्रातील उपलब्ध सुविधा व सेवा जनतेपर्यंत पोचवणे यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक श्री. राजकुमार ससपाडे यांनी सहज व सोप्या भाषेत उपस्थितांना दत्तक योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीम. दिपिका सावंत यांनी उपस्थित महिलांना कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन केले व  बालविवाह न करण्यासंबंधी मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा घेतली. विशेष सहकार्य ग्रामपंचायत माणगाव व उमेद अभियान माणगाव प्रभाग व अंगणवाडी सेविकांचे लाभले. या कार्यक्रमामध्ये एकूण 97 महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समिर शिर्के यांनी तर आभार श्री. प्रथमेश सावंत यांनी मानले.