रक्तपेढी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदानास आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद - उध्दट वागणूक : देव्या सुर्याजी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 11:33 AM
views 236  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद व उध्दट वागणूक दिल्याचा प्रकार रविवारी घडला. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असताना रक्तपेढीतील कर्मचारी शिष्टाचार पाळणार नसतील व रक्तदात्यांना चांगली वागणूक देत नसतील तर अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ कारवाई करावी अस आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे. 

ते म्हणाले, रविवारी रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याला अपमानास्पद वागणूक येथील डॉ.पटेल नामक महिला वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. वैद्यकीय अधिक्षकांना काय कळत ? अशाप्रकारची उध्दट भाषा त्यांची असून त्यांच्या अशा वागणूकीमुळे रक्तदात्यांंना मनस्ताप सहन करत रक्तदान न करता दोनदा माघारी परतावे लागले. सामाजिक बांधिलकीतून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी या महिला कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तात्काळ कारवाई न केल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय झाल्यास सर्वस्वी जबाबदार जिल्हा आरोग्य प्रशासन राहील असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.