शहरातील नागरिकांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवण्यापेक्षा रक्ताचे दर कमी करून दाखवा - आदित्य सापळे

सर्वसामान्य जनतेने केलेल्या रक्तदानातूनच हे रक्त उपलब्ध होत असते तरी देखील राज्य शासनाने रक्ताच्या पिशवींचे दर दाम दुप्पट का वाढविले.
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 29, 2023 17:52 PM
views 144  views

कणकवली- नगरपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील नागरिकांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवण्यापेक्षा रक्ताचे दर कमी करून घ्या. आज केंद्रापासून राज्यस्तरापर्यंत तुमचेच सरकार असताना आणि वाढलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत हे तुम्हालाही मान्य असताना आपण नागरिकांवर उपकार करतो हे दाखविण्यापेक्षा त्यांच्या हक्काचे दर कमी करून घेऊन दाखवा अशी टीका उ.बा.ठा. गटाचे युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे यांनी केली आहे.

राज्य शासनाने रक्ताच्या पिशवीचे दर दाम दुप्पट वाढविले. या विरोधात युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले. सर्वसामान्य जनतेने केलेल्या रक्तदानातूनच हे रक्त उपलब्ध होत असते. रक्त पिशवी म्हणजे सामान्य जनतेच्या हक्काची असते. सामान्य जनतेचे रक्त काढून घेऊन ते दाम दुप्पट दराने विकणाऱ्या सरकारचे डोळे उघडण्याचे काम आम्ही केले. सरकारने वाढविलेले रक्ताचे दर नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना ही मान्य नाहीत.हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. मात्र राज्यात त्यांची सत्ता आहे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार त्यांच्याच पक्षाचे असताना हे दर कमी व्हावेत यासाठी मात्र ते काहीच करत नाहीत.

सत्तेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आली असल्याने नगरपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील नागरिकांसाठी मोफत रक्ताची घोषणा केली जात आहे. हे न ओळखणे एवढे शहरातील नागरिक दूध खुळे नाहीत. निवडणुकीनंतर त्यांनी अशीच योजना चालू ठेवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. असा टोलाही सापळे यांनी हाणला आहे. 

सत्ताधाऱ्यांना जनतेची एवढीच काळजी आणि प्रेम असेल तर त्यांनी सत्तेच्या माध्यमातून हे वाढीव दर कमी करून जनतेला दिलासा देण्याचे काम करून दाखवावेच असे आव्हानही सापळे यांनी दिले आहे