नितीन गडकरींनी माफी मागण्यापेक्षा कोकणवासियांना टोलमाफी द्यावी

वैभव नाईक यांची घणाघाती टीका
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2026 13:25 PM
views 314  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडलेले असताना, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन आणि जनतेची मागितलेली माफी यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "नितीन गडकरींनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर कोकणवासियांना या महामार्गावर कायमस्वरूपी टोलमाफी द्यावी," अशी मागणी नाईक यांनी केली.

वैभव नाईक यांनी रस्ते वाहतूक मंत्र्यांवर थेट आरोप करताना म्हटले की, महामार्ग रखडण्यास स्वतः नितीन गडकरीच जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा वगळता रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम करणारे ठेकेदार कामे अर्धवट सोडून निघून गेले, तरीही अशा ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम मंत्रालयाकडून झाले. त्यामुळेच आज १४ वर्षे उलटूनही हा मार्ग अपूर्णावस्थेत आहे.

काल गडकरींनी महामार्गाच्या दिरंगाईबद्दल जनतेची माफी मागितली. मात्र, ही माफी प्रामाणिक नसून केवळ पुन्हा टोल वसुली सुरू करण्यासाठीची ही खेळी आहे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, "अर्धवट महामार्गामुळे झालेल्या अपघातांत हजारो कोकणवासियांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सरकार कोणती आर्थिक मदत देणार?"

टोलमाफीची प्रमुख मागणी

दीड दशकाचा प्रदीर्घ काळ कोकणच्या जनतेने हालअपेष्टा सहन केल्या आहेत. त्यामुळे केवळ शब्दांनी माफी मागण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांना टोलमधून पूर्णपणे मुक्त करावे, अशी आग्रही मागणी वैभव नाईक यांनी यावेळी केली आहे.