
सावंतवाडी : वायंगणी येथील कासव महोत्सवात आमदार दीपक केसरकर यांनी "कासव महोत्सव ही केवळ पर्यटनाची नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ आहे" असे विधान केले होते. या विधानाचा धागा पकडत समुद्रातील जैवविविधतेचे संवर्धन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सह्याद्रीतील वनसंपदेचे संरक्षण करणे गरजेचे नाही का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. अडीच हजार वर्षांत संपन्न झालेला हा निसर्ग उद्ध्वस्त करून नेमका कसला विकास साधला जाणार आहे ? १८ तासांचा प्रवास ८ तासांत होईलही. पण, त्यामुळे होणारी निसर्गाची कायमस्वरूपी हानी भरून काढता येईल का ? अशा गंभीरवेळी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
डॉ. परुळेकर म्हणाले, सह्याद्री हा जागतिक पातळीवरील जैवविविधतेचा 'हॉटस्पॉट' आहे. येथे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्या यांसारखे वन्यप्राणी आणि अत्यंत दुर्मिळ वनस्पती, कीटक व फुलपाखरांची मोठी संपदा आहे. मात्र, या 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्राच्या संरक्षणाबाबत शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीन दिसत आहेत. कासवांच्या संवर्धनाचे कौतुक करताना सह्याद्रीच्या या समृद्ध वारशाच्या विनाशाकडे आमदार डोळेझाक करत आहेत का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कोकणात आधीच लाखो वृक्षांची बेसुमार तोड सुरू आहे. त्यातच प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'मुळे भविष्यात निसर्गाची अपरिमित हानी होणार आहे. या प्रकल्पासाठी हजारो एकर सुपीक जमीन आणि घनदाट जंगल नष्ट केले जाणार आहे. कासव महोत्सवात संवर्धनाच्या गप्पा मारणारे आमदार सह्याद्रीतील वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावर गप्प का ? असा सवाल करत डॉ. परुळेकर यांनी याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.










