
वैभववाडी : भुईबावडा व करूळ घाटरस्ताचे काम दर्जाहीन झाले आहे.तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांचीही कामे निकृष्ट प्रतीची झाली आहेत.या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी शिवराज्य यात्रेनिमित्त आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी वैभववाडी तालुक्यात होत असलेल्या निकृष्ट कामांची माहीती त्यांनी त्यांना दिली.त्यासंदर्भात त्यांनी स्वतंत्र निवेदन देखील दिले.श्री.पाटील यांना दिलेल्या निवेदनात भुईबावडा घाटरस्त्यात झालेल्या निकृष्ट कामे झाली आहेत.
वैभववाडी-उंबर्डे रस्ता,खारेपाटण-गगनबावडा रस्ता या रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्यामुळे या मार्गाची दुरावस्था झाली आहे.या कामांमध्ये मोठा भष्ट्राचार झाला असुन त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.खासदार श्री.कोल्हे यांच्याकडे करूळ घाटरस्त्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे निवेदन दिले आहे.या कामांची देखील चौकशी करण्याची मागणी त्यांनी कोल्हेकडे केली आहे.दोनही नेत्यांनी श्री.चव्हाण यांना निकृष्ट कामांच्या बाबतीत लक्ष घालणार असल्याचे सांगीतले.तसेच याबाबत आवाज उठवला जाईल असे आश्वासन दिले.