सावंतवाडीत उद्यापासून ‘इनरव्हील महोत्सवा’ची धूम ; जगभरातील दर्शक ‘कोकणसाद LIVE’ वर पाहणार महोत्सव !

3 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नारी शक्ती सज्ज! शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पल्लवी केसरकर, सायली प्रभूंची प्रमुख उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: December 22, 2022 17:35 PM
views 697  views

सावंतवाडी : इयर एडिंगला मोती तलाव काठावर होणारा सावंतवाडी पर्यटन महोत्सव म्हणजे असा सोहळा जो नववर्षाचे स्वागत आनंदाने करतो. नव्या वर्षात नव्या संकल्पना, नवी उमेद घेऊन कार्यरत राहण्याची चेतना देतो. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणाने गेली तीन वर्षे हा महोत्सव सावंतवाडीकरांच्या नशीबात नाहीय. यंदा देखील तो होईल अशी परिस्थिती नाहीय‌. पण, जगात एकमेव अशी महाशक्ती आहे जी काहीही करू शकते, ती म्हणजे नारीशक्ती. सावंतवाडीच्या मनोरंजन व पर्यटनातील ३ वर्षांचा हा बॅकलॉग भरून काढायचं शिवधनुष्य इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीने उचलले आहे. 

शुक्रवारी २३, २४ व २५ डिसेंबर २०२२ अशा तीन दिवसांचा ‘इनरव्हील महोत्सव’ सावंतवाडीच्या जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी होणार असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाच उद्घाटन होणार आहे. शनिवारी सायली प्रभू यांची महोत्सवास उपस्थिती राहणार आहे. तर रविवारी २५ डिसेंबरला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. 

सलग तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून खवय्यांंसाठी चमचमीत पदार्थांची मेजवानी असणार आहे. एकंदरीतच २०२२ चे हॅपी एंडिंग करीत २०२३ च्या स्वागतासाठी सावंतवाडीकर सज्ज होणार आहेत‌. मीडिया पार्टनर कोकणचे नंबर १ महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून या महोत्सवाचे कव्हरेज जगभरातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कोकणी माणसांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

या महोत्सवात मनोरंजनासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, स्टॅच्यू स्पर्धा तसेच खास आकर्षण ३० ते ५० वयोगटातील महिलांसाठी 'इनरव्हील क्वीन' ही स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे. या महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसेही आयोजित केली आहेत. त्याचप्रमाणे 'लकी ड्रॉ कुपन' हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. 

'इनरव्हील महोत्सवाचे' हे शिवधनुष्य महिलांनी उचलले असून आव्हान खूप मोठे आहे.  कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित होत आहे. यात जिल्हावासीयांनी सहभागी होत इयर एंडिंग गोड करावा, असे आवाहन इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक- धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर यांनी केले आहे.