
वेंगुर्ला : येथील वेंगुर्ला शहर सर्कल मध्ये येणाऱ्या आंबा बागायदार शेतकरी यांच्यावर पीक विमा कंपनी कडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेबाबत अन्याय होत आहे. त्यामुळे वेंगुली सर्कल मध्ये येणाऱ्या गावांना ३७°c तापमान मध्ये गृहीत धरावे आणि चालू वर्षी उष्णतेमुळे मिळणारे नुकसान भरपाई हेक्टरी ५६ हजार रु. एवढी आहे, ती सरसकट विमा भरणाऱ्या शेतकऱ्याना मिळावी. अन्यथा शेतकरी बागायतदार यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२३ देशाच्या स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वेंगुली सर्कल मधील आंबा बागायतदार शेतकरी यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात शेतकऱ्यांनी असे म्हटले आहे की, वेंगुर्ला सर्कलचे तापमान मोजमाप यंत्र तहसीलदार कार्यालय येथे असून ते बंद अवस्थेत आहे. तसेच फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील तापमान मोजमाप यंत्र एप्रिल २०२२ मध्ये बंद होते. त्यामुळे विमा कंपनी कडून वेंगुर्ला येथील आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यावर्षी ३७℃ पेक्षा जास्त तापमान झालेले होते. तसेच वेंगुर्ला सर्कलच्या लगतचे मातोंड व वेतोरे सर्कल येथे सतत १० दिवसांपेक्षा अधिक ३७℃ तापमान आढळून आलेले आहे. त्यामुळे सतत ६ दिवसांपेक्षा अधिक तापमान आढळून आल्यास ५६ हजार रु. विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
आंबा पीक वर्ष २०२३ मध्ये प्रचंड उष्माघातामुळे आंबा बागेतील फळांची अतोनात फळ गळती होऊन प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे वेंगुली सर्कल मधील गावांना ३७°c तापमान मध्ये गृहीत धरावे आणि चालू वर्षी उष्णतेमुळे मिळणारे नुकसान भरपाई हेक्टरी ५६ हजार रु. एवढी आहे, ती सरसकट विमा भरणाऱ्या शेतकऱ्याना मिळावी. अन्यथा शेतकरी बागायतदार १५ ऑगस्ट २०२३ देशाच्या स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडतील. तरी आपले कडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आंबा बागायतदार शेतकरी ललीतकुमार ठाकूर, संजय गावडे, बबन साळगावकर, वाल्मिकी कुबल, अमेय नवार, युवराज ठाकूर, बापू गावडे, अनिल गावडे, ज्ञानेश्वर अणसुरकर, दीपक आईर, प्रभाकर ठाकूर, विजय ठाकूर, पांडुरंग गावडे, सुरेश ठाकूर, सुभाष बोवलेकर, सुनील बोवलेकर, दिनेश गावडे, भास्कर गावडे, सहदेव ठाकूर, रविंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.