
कुडाळ : कुडाळ येथील एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेने आगार प्रमुखांच्या कार्यालयाला जोरदार धडक दिली. एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळी योग्य आराम न मिळणे, वारंवार पत्रांना केराची टोपली दाखवणे, तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारे हाल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या वेळी संघटनेचे पदाधिकारी संदेश ऊर्फ गोट्या सावंत, जयेश चिंचळकर, रुपेश कानडे, सुनील बांदेकर, निलेश तेंडूलकर आदींनी आगार प्रमुखांसमोर कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या.
संघटनेने उपस्थित केलेल्या प्रमुख मागण्या आणि मुद्दे खालीलप्रमाणे:
- आरामाशिवाय ड्युटी : एका वाहकाची ड्युटी संपायच्या आतच त्याला दुसऱ्या गाडीची ड्युटी दिली जाते. नियमानुसार आराम मिळणे आवश्यक असतानाही, सतत काम करावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
- सीएनजी बसमुळे त्रास: डेपोमध्ये स्वतःचे सीएनजी स्टेशन नसल्यामुळे, सीएनजी भरण्यासाठी लांबवर जावे लागते. गणेश चतुर्थीच्या काळात यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
- अनियमित ड्युटी आणि व्यवस्थापन: कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेवर लावल्या जात नाहीत. वाहतूक नियंत्रक मोर्ये यांच्या कामात होणारी ढवळाढवळ चुकीची आहे. काही कर्मचाऱ्यांवर विशेष मेहरबानी आणि काहींना त्रास देणे असे दुजाभाव करणारे व्यवस्थापन सुरू आहे.
- गाड्यांच्या वेळापत्रकाचा अभाव: गाड्या वेळेवर सुटत नसल्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही अडचणी येत आहेत. कुडाळ-देवगड बस रद्द होणे किंवा उशिरा सुटणे हे तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी बोलताना संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “कर्मचाऱ्यांचे हाल तात्काळ थांबले पाहिजेत. सर्व काम नियमित आणि सुरळीत सुरू झाले पाहिजे. चुकीला माफी नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जर गाड्यांचे नियमित सुटणे आणि कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबला नाही, तर १८ ऑगस्ट रोजी आपले सत्कार नक्कीच होईल.”
या आंदोलनामुळे कुडाळ डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. संघटनेने प्रशासनाला दिलेला इशारा पाहता, आगामी काळात या प्रश्नांवर काय तोडगा काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.