सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मतमोजणी, निकाल नंतर मिरवणुका, तसेच दि. ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी/ महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेमुळे हिंदु समाजातर्फे विजय दिवस व मुस्लीम समाजाकडून काळा दिवस पाळला जातो, तसेच जिल्ह्यात वैयक्तिक व सामाईक मागणीकरीता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी विधानसभा निवडणुक २०२४ ची मतमोजणी, सण उत्सव तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.