
दोडामार्ग : देशसेवेसाठी आयुष्याचा अमूल्य कालावधी अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून आयनोडे पुनर्वसन गावात एक प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सन्मान सैनिकांचा, अभिमान आमच्या गावाचा” या उपक्रमांतर्गत गावातील माजी सैनिकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
देशाच्या सीमांचे रक्षण करताना कठोर परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या माजी सैनिकांप्रती गावकऱ्यांनी कृतज्ञतेने नतमस्तक होत त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी भारावून गेले होते.
या वेळी शंकर भद्रीके, महादेव कृष्णा सावंत, सत्यवान लक्ष्मण नाईक, कृष्णा रामा ठाकूर, उदय लाडू सावंत, रामचंद्र विठोबा सावंत, रामदास तुकाराम चौगुले, हरीभाऊ देसाई, मिलिंद जयराम सावंत, चंद्रकांत भिकाजी आयनोडकर, अभिजित विकास ठाकूर, राजन पांडुरंग सावंत, नारायण मधुकर ठाकूर, निलेश लक्ष्मण सावंत तसेच भिकाजी घुमे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सैनिकांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती यांचा गौरव करत, त्यांच्या योगदानामुळेच देश सुरक्षित असल्याचे नमूद केले. “आजचा हा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव नसून संपूर्ण सैनिक सेवेचा मान आहे. पुढील पिढीनेही या आदर्शातून प्रेरणा घ्यावी,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यास देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, उपाध्यक्ष प्रदीप देसाई, सचिव अरुण सावंत यांच्यासह विश्वस्त विलास सावंत, हर्षद सावंत, विष्णू सावंत, तसेच निलेश सावंत, सदाशिव आयनोडकर, बालानंद देसाई, उदय सावंत, कृष्णा ठाकूर, रामचंद्र सावंत, नारायण सुतार, डेमा आयनोडकर, लक्ष्मण सावंत (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी), प्रमोद देसाई, आनंद ठाकूर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रदीप देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन सावंत यांनी मानले. आयनोडे गावात पार पडलेला हा सोहळा केवळ सत्कार कार्यक्रम न राहता देशभक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा ठरला.











