पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची मागणी

Edited by:
Published on: November 23, 2023 16:13 PM
views 140  views

देवगड : देवगड तालुक्यातील बंदरात देवगड मधील पारंपारिक मच्छीमारांवर अतिक्रमण करून पर्ससीन नौकाद्वारे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे.याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार मत्स्य व्यवसाय विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून देखील या पर्ससीन मासेमारी नौका अनधिकृतरित्या विनापरवाना मासेमारी करतात, व ती मासळी देवगड बंदरात उतरली जाते, प्रसंगी याच ठिकाणी या नौका नांगरून ठेवले जातात .४ ते ५ वाव अंतरात किनारपट्टी नजीक या पर्ससीन नौका वारंवार मासेमारी करीत असल्यामुळे पारंपारिक मच्छिमार व रापण संघावर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे.

मत्स्य विभागाच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून येत्या ८ दिवसात अनधिकृत रित्या मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कडक कारवाई करण्यात न आल्यास बेमुदत उपोषण सिंधुदुर्ग मालवण मत्स्य व्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर करण्याचा इशारा देवगड तालुक्यातील पारंपारिक मच्छिमार व रापण संघाने लेखी निवेदनाद्वारे मत्स्य परवाना अधिकारी देवगड यांना दिला आहे.या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक देवगड, आणि तहसीलदार देवगड यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अनधिकृत रित्या कीनारपट्टीवर पर्ससीन नौका मासेमारीमुळे पारंपारिक मच्छीमारांना मिळणाऱ्या माशांचे प्रमाण फारच कमी झाले आहे.त्या माशाला अपेक्षित भावही मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबांवर उपासमारीची पाळी येऊन ठेवली आहे.वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. येत्या ८ दिवसात या अतिक्रमण करून मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तसेच या बोटीने देवगड बंदरातून अन्यत्र न पाठविल्यास१ डिसेंबर २०२३ रोजी पासून सहाय्यक आयुक्त व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग मालवण यांच्या कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्यात चा इशारा या पारंपरिक मच्छिमार वर रापण संघाने दिला आहे. या अनुषंगाने बुधवारी सकाळी देवगड ,तारा मुंबरी,कुणकेश्वर , येथील पारंपारिक मच्छिमार रापण संघाच्या प्रतिनिधींनी मत्स्य परवाना अधिकारी देवगड यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांना याविषयी जाब विचारला व यावर योग्य ती कार्यवाही येत्या ८ दिवसात न झाल्यास सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग मालवण यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण अधिक १५ परवानाधारक पर्ससीन नौका असून त्यापैकी ४ नौका अधिकृत परवाना धारक देवगड मध्ये आहे असे असताना या ४ नौका परवानाधारकांकडून देखील कायद्याचे उल्लंघन करून किनारपट्टी नजिक येऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते तसेच अनधिकृत विना परवाना नौका देखील ३ ते ४ वावाच्या आत मासेमारी करतात याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या कुणकेश्वर येथील रापण महोत्सव देखील रापण कंपनीला आला या निमित्ताने पारंपारिक मच्छिमार व रापण कंपनी प्रतिनिधी यांच्या तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून यापूर्वी देखील शासन व प्रशासनस्थळावर वारंवार मागणी करून देखील याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

असा आरोपही या पारंपारिक मच्छिमार व रापण संघांनी केला आहे .यावर ठोस कारवाई न झाल्यास कोणत्या क्षणी यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निमित्ताने दिला आहे. एकंदरीत पाहता देवगड बंदरात पुन्हा एकदा पर्ससीन नौका धारक आणि पारंपारिक मच्छीमार व रापण संघ यांच्या संघर्षाची ठिणगी पडणाऱ्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याकडे शासन प्रशासनाने वेळीच लक्ष देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे . यावेळी प्रसाद धुरात, विलास तेजम, किशोर जोशी, संतोष लाड अशोक पेडणेकर ,विश्वास भुजबळ वसंत लाळये, पांडुरंग डांमरी, गणेश गावकर, अरुण घाडी व अन्य पारंपरिक मच्छीमार तसेच आपण कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.