येत्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत उद्योग मंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 16, 2023 19:28 PM
views 130  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येतील, असा आमचा मानस आहे. याबाबत सिंधुदुर्गातील पक्ष वरिष्ठांशी आपण चर्चा करू, असे वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात आले होते. मंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत कुडाळ येथे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत रत्नागिरी - सिंधुदुर्ग खासदारकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सामंत यांनी सांगितले.तर उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली. भाजप आणि शिंदे गटाला गाडण्यासाठी ही हातमिळवणी केली असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले, त्यावर पत्रकारांनी विचारले असता, नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील आणि राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

तर खासदारकीचा उमेदवार हा रेस्ट हाऊस किंवा  खासगी कार्यक्रमात ठरत नसतो, असा टोलाही सामंत यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. तर खासदारकीचा उमेदवार राज्यातील तीन नेते ठरवितात तर भाजपचा उमेदवार अमित शहा, नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा ठरवितात, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, सिद्धी शिरसाट, रामकृष्ण गडकरी, किसन मांजरेकर, आदींसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.