
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग क्षेत्राचा विस्तार, त्यातून रोजगाराला संधी व त्यामुळे जनतेच्या दरडोई उत्पन्नात वाढ हा मंत्र घेऊन उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दि. ३० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे पत्रकार भवनात पालकमंत्री तथा राजाचे मंत्री नितेश राणे यांचे उपस्थितीत उद्योग व गुंतवणूक परिषद होत आहे. यावर्षी कोकण विभाग उद्योग परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग परिषदेतील ७३ उद्योजक या जिल्ह्यात ६ कोटी ३५ लाख गुंतवणूक करतील व या उद्योगातून १४१२ रोजगार उपलब्ध होतील अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उद्योग परिषदेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले उपस्थित होते. व्यवस्थापक रवींद्र पत्की, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ३० एप्रिल रोजी सिंधुनगरी येथील पत्रकार भावनांमध्ये सकाळी १०. ते सायंकाळी ४. वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही परिषद होत आहे. यावेळी उद्योग विभागाचे आयुक्त दिपेंद्र सिंग खुशावह, विजू शिरसाथ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्योग परिषदेमध्ये यापूर्वी सामील झालेले कोकण विभाग स्तरावरील ४३ उद्योग घटक व या जिल्हा स्तरीय उद्योग परिषदेमध्ये दाखल झालेले ३० उद्योग घटक यात सहभागी होणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील, जिल्हा बाहेरील राज्याबाहेरील उद्योग घटकांना सामील व्हावे व गुंतवणूक करावी यासाठी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ९१ उद्योजक या जिल्ह्यातील गुंतवणूक व उद्योग विकासासाठी सहभागी झाले होते. त्यापैकी ६४ उद्योजकानी आपले उद्योग सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. जवळपास ५५ उद्योग सुरू झाले आहेत.९ उद्योग प्रकरणात अनेक परवानग्या व कच्चा माल या प्रतीक्षेत आहेत. व १४ उद्योजकानी जमीन ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही अद्याप सुरू केलेली नाही. यात ४४६ कोटी. गुंतवणूक आणि १८६७ रोजगार निर्मिती होणार होती. यातील फक्त चार उद्योजक घटकांनी माघार घेतल्यामुळे यातील गुंतवणूक १२ कोटी ४६ लाखांनी कमी होईल व १८६७ रोजगाराच्या संधीतून ५२ रोजगार कमी होतील. त्यामुळे या जिल्ह्यात गेल्या वर्षी व यावर्षीही नवीन उद्योजक व रोजगाराच्या संधी या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. पर्यावरण पूरक व कृषीवर आधारित उद्योगांवर विशेष भर या जिल्ह्यात देण्यात आला आहे. पर्यटनावर आधारित उद्योग, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, मसाले अशा उद्योग घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. रासायनिक व पर्यावरण पूरक नसलेल्या उद्योगांना या जिल्ह्यात वगळण्यात आले आहे. असेही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.