
रोहा : रोहा तालुक्यातील किल्ला येथील सैन्यदलातील निवृत्त सैनिक तर सध्या रायगड पोलीस प्रशासनात हवालदार म्हणून कार्यरत असलेले दत्ताराम महाडीक यांच्या मातोश्री इंदिराबाई उर्फ शारदाबाई बबन महाडिक यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या निधनाने महाडिक कुटुंबीयांसह किल्ला पंचक्रोशीत शोकाकूल वातावरण झाले आहे.
अतिशय प्रेमळ,सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या इंदिराबाई महाडिक या सर्व आप्त स्वकीय, मित्र परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या. अतिशय काबाडकष्ट करून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. कुटुंबात शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभामुळे सर्वांनाच त्या प्रिय होत्या. आपल्या सुनांवर त्यांनी मुलींसारखे प्रेम केले. पारंपारिक सणासुदीच्या कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत. इंदिराबाई या वारकरी सांप्रदायिक होत्या. त्यांना अचानक अल्पशा आजाराने ग्रासले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. त्यांच्या अंत्ययात्रेकरीता सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तस्वकीय असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.