कोकणचा विनाश करायला राणे - केसरकरांची अभद्र युती : खा. विनायक राऊत

Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 15:35 PM
views 48  views

सावंतवाडी : इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत बोलताना उमेदवार तथा खासदार विनायक राऊत म्हणाले, अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही. ही भूमी पवित्र आहे. नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत. सींगल पैशाची चहा न पाजणारे भरभरून खिसा मोकळा करत आहे. शिवसेनेशी, ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्यांना गाढण्याच काम कोकणी जनतेनं केलं. आम्हाला खोक्यांची गरज नाही. आमच्याकडे बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांच्यासह कोकणी जनतेचा आशीर्वाद आहे असं विधान खासदार विनायक राऊत यांनी केलं. 

लोकांच्या मतांची कदर करणारे ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर ठाकरे सरकारनं केलेल्या विकासाला या सरकारनं खीळ घातली.  दीपक केसरकर यांचा राणेंनी केलेला अपमान सावंतवाडीची जनता विसरली नाही. वेंगुर्ला शहरातील प्रकार, उमेश कोरगावकरांवरचा हल्ला जनता विसरली नाही. ही राडेबाजी पुन्हा उभारू पहात आहेत. आमचे झेंडे पोटदुखीतून उतरवायचे काम दीपक केसरकर यांनी केल. त्यांनी लक्षात ठेवावं लोकसभेला मला सावंतवाडीत मताधिक्य मिळेलच. पण, विधानसभेला तुमचं दुकान बंद होईल असा इशारा विनायक राऊत यांनी दिला. भाजप सरकारने काजू निर्यातीला बंदी घातली. कोकणच्या काजूला दुय्यम स्थान देत आफ्रिकेचा काजू इथे आणला. भविष्यात काजूला आर्थिक सुबत्ता यावी यासाठी मी या आधी प्रयत्न केला पुढेही करेन. आम्ही काय केलं विचारणाऱ्या विरोधकांनी स्वतःचा विकास केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलं. सिंधुदुर्गच भलं करण्याच काम केलं. सावंतवाडीच मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल काही झालं नाही. मंजूर झालेली कॅथलॅब सिंधुदुर्गतून सोलापूरला पाठवायचे काम भाजपन राणेंच्या हॉस्पिटलसाठी केली असा आरोप विनायक राऊत यांनी केला. राणे - केसरकरांची झालेली अभद्र युती ही कोकणच्या विनाशासाठी झालेली आहे‌. इथला निसर्ग, सौंदर्य नष्ट करण्यासाठी झालेली आहे‌ असं ते म्हणाले. 

सिंधुदुर्ग जिल्हा हा परप्रांतीय भुमिमाफींना सोन्याची अंडी वाटू लागतं आहे. याला कारणीभूत नारायण राणे व दीपक केसरकर आहेत. इथली जमीन सिडकोच्या ताब्यात देण्याचा घाट त्यांनी घातला आहे. कोकणभूमी आमच्या पूर्वजांची, ती सांभाळायच काम आम्ही केलं आहे. त्यामुळे कोकणभूमीच रक्षण करणाऱ्या ठाकरेंना, या विनायक राऊतला निवडून द्या व आमच्या जमिनींवर डल्ला मारायला आलेल्यांना माघारी पाठवा असं आवाहन खा. राऊत यांनी केलं. एक सामान्य कुटुंबातील मी मुलगा आहे‌.‌ बाळासाहेबांनी मला मोठं केलं. त्यामुळे आमच दैवत मातोश्रीच राहील. शरीरात राम आहे तोवर ठाकरेंशी प्रामाणिक राहणार असल्याचे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न निकाली लावणार असल्याचे ते म्हणाले ‌ 

याप्रसंगी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अतुल रावराणे, कॉग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला नेत्या कमलताई परूळेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, बाळा गावडे, मायकल डिसोझा  आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.