
सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली गावातील ग्रामस्थांनी वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. आज सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंतांची त्यांनी भेट घेतली.
गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणि वस्ती भागात वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना निवेदन सादर केले. या निवेदनात गावातील महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.
कार्यकारी अभियंता इंगवले यांनी या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी न्हावेली माजी सरपंच शरद धाऊस्कर, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊस्कर, सचिन पार्सेकर, विलास मुळीक, सुर्यकांत धाऊस्कर, लक्ष्मण धाऊस्कर, निलेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.