आचऱ्यात परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ

२५ गावांमध्ये राबवला जाणार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 16, 2025 21:07 PM
views 10  views

मालवण :  शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथे करण्यात आला. पुढील चार वर्षांसाठी हा प्रकल्प आचरा परिसरातील २५ गावांमध्ये राबवला जाणार आहे.

आमदार राणे यांनी प्रकल्पाची माहिती घेतली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, सरपंच जेरॉन फर्नांडिस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, सचिन हडकर, अभिजीत सावंत, मनोज हडकर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हा प्रकल्प वनराई ट्रस्ट पश्चिम महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँक यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. वनराई ट्रस्टचे सागर धारिया यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पाण्याचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधणे आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे हा आहे. पुढील चार वर्षांच्या काळात हा प्रकल्प नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शाश्वत कृषी विकास, मासेमारी व्यवसाय व संबंधित उद्योग, उपजीविका वृद्धी, शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे असे स्पष्ट केले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून आचरा परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.