पत्रकार दिनाला 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचा उद्घाटन सोहळा निश्चित | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री येणार उद्घाटनाला !

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभेत महत्वपूर्ण निर्णय
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 03, 2022 18:08 PM
views 199  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभा कुडाळ येथील विश्रामगृहावर संपन्न झाली. सहा जानेवारी 2023 ला पत्रकार दिनाच्या निमित्ताने  सिंधुदुर्ग मुख्यालय येथे सिंधुदर्ग सुपुत्र दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गण यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज पार पडलेल्या विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला. 

अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर,   मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, सचिव देवयानी वरस्कर, खजिनदार संतोष सावंत उपाध्यक्ष महेश सरनाईक, बंटी केनवडेकर, बाळ खडपकर कार्यकारणी सदस्य दीपेश परब, राजन नाईक, हरिश्चंद्र पवार, संतोष राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.  

या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाची एक समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जाऊन येथील मान्यवरांना निमंत्रित करणार आहे.  जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे मिळण्यासाठी संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांच्या हॉटेलकडे आपापली आधार कार्ड झेरॉक्स व फोटो दहा डिसेंबरपर्यंत द्यायचे आहेत असा ठराव या बैठकीमध्ये आयत्याच्या विषयामध्ये घेण्यात आला.  दरम्यान ओळखपत्र शिवाय उद्घाटन कार्यक्रमास प्रवेश मिळणार नसल्यामुळे दिलेल्या तारखेला आपले ओळखपत्रसाठी लागणारे कागदपत्र देण्याचे आवाहन अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले. 

तसेच सभासदांनी आपली सभासद फी 30 डिसेंबर पर्यंत खजिनदार संतोष सावंत यांच्याकडे जमा करायची आहे, असाही ठराव घेण्यात आला. या बैठकीमध्ये कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार संघाच्या या भवनासाठी लागणारी मदत आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.  संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राज्य पर्यटन समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनावा ठराव मंजूर करण्यात आला. त्याच बरोबर पत्रकार भवनांच्या स्वप्नपूर्तीचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचाही अभिनंदनचा ठराव संमत करण्यात आला.  या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची प्रसिद्धी करण्यासाठी हरिश्चंद्र पवार यांची निवड करण्यात आली

या बैठकीमध्ये कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, राजन नाईक, बंटी केनवडेकर, नंदकिशोर महाजन यांनी चर्चेत सहभाग घेतला