वैभववाडीत सिंधू वैभव ॲग्रो कंपनी - तालुका ख.वि.संघाकडून काजू बी खरेदीला प्रारंभ

काजू उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा मिळतोय दर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 06, 2024 15:07 PM
views 90  views

वैभववाडी : तालुक्यातील सिंधूवैभव ॲग्रो फार्मर कंपनी आणि तालुका खरेदी विक्री संघाने आज ता.६ पासुन वैभववाडीत काजु बी खरेदी करण्यास सुरूवात केली.तालुका खरेदी विक्री संघाच्याकार्यालयानजीक हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. बाजारभावापेक्षा १५ रूपये अधिक दराने काजु खरेदी करण्यात येत आहे.यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

   जिल्ह्यात सध्या काजु बी च्या दरावरून  काजु उत्पादक अस्वस्थ आहेत.जिल्ह्यात घसरलेल्या काजू दराविरोधात अनेक आंदोलने झाली.योग्य दर मिळत नसल्याने काजू उत्पादक हैराण झाले होते. त्यामुळे गेल्याच आठवड्यात सिंधुवैभव कंपनीचे अध्यक्ष महेश गोखले आणि तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांमध्ये महत्वपुर्ण बैठक झाली.या बैठकीत काजु उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सिंधुवैभव कंपनीने काजु बी खरेदी करावी यावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती वैभववाडी आठवडा बाजारात काजु बी चा असलेल्या दरापेक्षा प्रतिकिलो अधिक १० रूपये देण्याचा निर्णय कंपनीने घेतला.

दरम्यान आज सकाळी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाबाहेर काजु बी खरेदीचा शुभांरभ करण्यात आला.यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे,जिल्हा बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण, अध्यक्ष महेश गोखले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बोडके, संघाचे संचालक अंबाजी बोडके, राजु पवार, कृषी उत्पन्न समितीचे अधिकारी श्री.दळवी, महेश राणे आदी उपस्थित होते.