मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवा : अमित इब्रामपूरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 06, 2023 14:46 PM
views 213  views

मालवण : मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हडीतील १२ परप्रांतीय कामगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचबरोबर त्यांना आपल्या मूळ गावी परतण्याची समजही देण्यात आली या कारवाई बद्दल मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे "मनसे कौतुक" करत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी आपल्या भागात असलेल्या परप्रांतीयांची नोंद ठेवावी असे आवाहन मनसेकडून अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे. 

         त्यासाठी लवकरच मनसे शिष्टमंडळ मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ४ डिसेंबरच्या मालवण दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यानी आपापल्या पोलिस ठाण्यात परप्रांतीयांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार कायदा १९७९ प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 

         जिल्ह्यात येणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भाडेकरू,वाळू उत्खनन करणारे, बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करणारे, परप्रांतीय कामगारांची नोंद असलीच पाहिजे. गरज वाटल्यास व संशयास्पद असल्यास त्यांना घरी पाठवून द्या. अशा व्यक्तींकडून गुन्हे घडण्याची शक्यता असते. काल पुणे शहरात पकडलेल्या दहशतवाद्यांचा देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता, अशी माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात उघडकीस आली आहे. ‘इस्लामिक स्टेट (आयएस) आणि अलसुफा या दहशतवादी संघटनांशी संबंधित या दहशतवाद्यांनी जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची माहिती घेऊन देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याची तयारी केली होती.त्याचे धागेदोरे आंबोली व  शेजारच्या रत्नागिरी जिल्हा पर्यंत पसरले आहे. जिल्ह्यात सायबर क्राईम ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण  वाढले आहे. यातील गुन्हेगार हे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करीत असतात. ज्येष्ठ नागरिकांना सायबर व ऑनलाईन फसवणुकीची माहिती नसते. अनोळखी व्यक्ती जिल्ह्यात येऊन नागरिकांच्या घराची रेकी करून सायबर क्राईम  होण्याची शक्यता असल्याचे नाकारता येत नाही. 

       त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वेळीच दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.