
सावंतवाडी : गेली २२ वर्षे हत्तींच्या त्रासाला कंटाळून निवेदन देऊनही कुणी लक्ष देत नसल्याने दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधीत तब्बल दहा गावांनी आज सावंतवाडी वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. नुसती तोंडी आश्वासने नको, वनमंत्री, वरिष्ठांकडून लेखी पत्र द्या, अन्यथा अधिकार आमच्या ताब्यात द्या असा संतप्त पवित्रा घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर आम्हाला रोखण्यासाठी वापरलेलं पोलीस बळ हत्तींकडून शेतकऱ्यांच होणार नुकसान रोखण्यासाठी लावा अशी तीव्र भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वनविभाग कार्यालयासमोर भरपावसात तब्बल ६ तास हे आंदोलन चाललं. स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठकीच लेखी आश्वासन वनविभागाकडून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं.
दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, पाळये, सोनावळ, हेवाळे,मुळस, बाबरवाडी आदि हत्तीबाधीत गावातील शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा गुरूवारी सकाळी वनविभाग कार्यालयावर धडकला. यावेळी गेली २२ वर्षे पत्रव्यवहार करूनही त्याला वनखात उत्तर देत नाही. आजही हत्तींचा प्रश्न कायम आहे. रानटी हत्तीकडून शेती बागायतींच्या नुकसानीसह मनुष्य हानी देखील होत आहे. शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. त्यामुळे नुसती तोंडी आश्वासने नको, लेखी पत्र द्या. अन्यथा अधिकार आमच्या ताब्यात द्या, आम्ही एका शब्दानेही कोणाला विचारणार नाही. आमचे संरक्षण आम्ही करू अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी तब्बल सहा तास आंदोलन छेडले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी वरिष्ठांशी चर्चा करत आंदोलन कर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू, लेखी पत्र न दिल्यान आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम राहिले.
अखेर सायंकाळी उशिरा स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत सर्व गावातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची येत्या १५ दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक लावून ठोस उपाययोजना करण्याच लेखी आश्वासन वनविभागाकडून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केल. तर भाजप नेते, माजी आमदार राजन तेली यांनी देखील वनमंत्री मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लक्ष वेधलं.
या आंदोलनाला भाजपचे नेते , माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, केसरकर समर्थक शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजू निंबाळकर, बबन उर्फ नारायण राणे, अँड. निता कविटकर, शिवसेना ठाकरे गटाचे मायकल डिसोझा आदींनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. यावेळी पंकज गवस, आप्पा गवस,प्रेमनाथ कदम, प्रवीण गवस, महादेव देसाई आदींसह शेकडो नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, या आंदोलनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विरोधकांची भुमिका बजावावी लागली. भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,राजू निंबाळकर, बबन उर्फ नारायण राणे, अँड. निता कविटकर यांना
तब्बल तीन तास अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे न गेल्यानं भर पावसात शेतकऱ्यांसह उभं रहावं लागलं. शेवटी शेतकऱ्यांचा संयम सुटत असल्याच पाहून शिवसेनेच्या अँड. निता कविटकर व राजू निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले.