सप्तरंगीची मुळे काढणारे रंगेहात वनविभगाच्या जाळयात

Edited by: दिपेश परब
Published on: December 08, 2023 19:48 PM
views 1761  views

वेंगुर्ला :  सावंतवाडी वनविभागाचे अखत्यारितील कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ परिमंडळा अंतर्गत तुळस येथील जंगलात अवैधरित्या सप्तरंगी झाडांची तोड करुन त्याची मुळे काढून ती वाहतुक करत असताना ५ जणांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या गुन्हयात सप्तरंगी वनस्पतीची मुळे भरलेली ८ पोती व मुळे काढण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारांसह एकूण १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वनविभागाने दिलेल्या महितीनुसार, तुळस वनविभागाचे १७१.५७ हेक्टर राखीव वन आहे. दि. ७ डिसेंबर रोजी वनपाल मठ व वनरक्षक तुळस स्टाफसह तुळस वनक्षेत्रातून सप्तरंगी झाडांची तोड करुन त्याची मुळे काढून ती वाहतुक होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार जंगल पायथ्याशी दबा धरून बसले असता, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ५ इसम डोक्यावरुन प्लॅस्टिक पोती घेऊन येत असताना दिसले. यावेळी जंगल पायथ्याशी अटकाव करुन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे ५ प्लॅस्टिक पोत्यामध्ये सप्तरंगी (Salacia Oblonga) आढळून आले. त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता, जंगल पायथ्याशी झाडीझुडपात सप्तरंगी मुळाने भरलेली आणखीन ३ पोती काढून दाखविली. त्याच बरोबर सदर मुळे खोदण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे कुदळ, कोयता व भाला सदृश्य हत्यार दाखविली. याबाबत पंचनामा करून वनविभागाने आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.  

पिंट्या निकम (३६) वेंगुर्ला कॅम्प- घाडीवाडा, एकनाथ पवार (२८) कणकवली, रावजी निकम (४५) कणकवली, रामा निकम (२२) कणकवली, कृष्णा निकम (२६) वेंगुर्ला कॅम्प- घाडीवाडा अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान ८ डिसेंबर रोजी या आरोपींची अधिक चौकशी केली असता आरोपी यांनी संगनमत करुन शासकिय राखीव वन कक्ष क्रमांक १३८ मध्ये अपप्रवेश करुन सप्तरंगी झाडाची तोड करुन त्याची मुळे खोदुन काढून विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करण्याच्या गुन्हाची आरोपींनी कबुली दिल्याने स्पष्ट झाले आहे. आरोपींना आज  वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता ११ डिसेंबर पर्यत वन कोठडी देण्यात आलेली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. कुंभार हे एस. नवकिशोर रेड्डी उप-वनसंरक्षक सावंतवाडी व एस. के. लाड, सहा वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, वरील कारवाई मठ वनपाल सावळा कांबळे, नेरूर वनपाल अनिल राठोड, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत, उपवडे वनरक्षक बदाम राठोड, वडोस वनरक्षक अमोल पटेकर, माणगाव वनरक्षक अनिकेत माने, तुळस वनमजूर तुळस संतोष इब्रामपूरकर यांनी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ रमाकांत दुंबरे व जया शिरोडकर यांचे सहकार्य लाभले. या गुन्हयाचा आधी तपास प्रगतीवर असून, सदर गुन्हयात आणखीन आरोपीचा समावेश असून त्यांना दोन दिवसांत ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली आहे.