
कुडाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुडाळ शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी नगरपंचायत कुडाळ मार्फत त्वरित सूचना देण्यात याव्या यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मुख्याधिकारी नगरपंचायत कुडाळ यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत दिलेल्या निवेदनानुसार नगरपंचायत कुडाळ यांनी याची तात्काळ दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ शहरातील दुकाने व आस्थापने यांच्यावरील फलक पाट्या या मराठीत करणे संदर्भात येत्या पाच ते आठ दिवसांत आपल्या पद्धतीने समाचार घेईल. या निवेदनाची प्रत माहितीसाठी पोलीस स्टेशन आणि व्यापारी संघटणा यांना देखील देण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर, एसटी कामगार संघटणा उपाध्यक्ष बनी नाडकर्णी ,जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष कुडाळ हेमंत जाधव, महाराष्ट्र सैनिक प्रथमेश धुरी व आदिल शहा आदी उपस्थित होते.