
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि आम्ही भारतीय संस्थेतर्फे ' सजग पालकत्व सभा ' प्रशालेत घेण्यात आली. या सभेतंर्गत इ. ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांच्या पालकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी ॲड. श्री. संदिप निंबाळकर, लेखक व मानसोपचार तज्ञ डॉ . रुपेश पाटकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक असे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सम्माननीय मान्यवर उपस्थित होते. तसेच सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे इ. ९ वी चे प्रतिनीधी श्रीम. जास्मीन पटेल व इ. व १० वी चे प्रतिनीधी श्री. आमिर मालिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
ॲड . संदिप निंबाळकर यांनी सजग पालकत्व काळाची गरज यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांनी पालक व मुलांमध्ये सुसंवाद असावा, असे मत व्यक्त केले. मानसोपचार तज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांना सहनशीलता आणि संयम, विश्वास आणि संस्कार याविषयीचे योग्य वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध करून देऊ नये, असे आग्रही मत मांडले. पालकांनीही प्रशालेच्या मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांसाठीही अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करावे, अशी विनंती केली. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम. मारिया पिंटो यांनी आभार मानले.