नेमळे विद्यालयात 'आजी - आजोबा कृतज्ञता दिन' उत्साहात..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 14, 2023 20:08 PM
views 132  views

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'आजी - आजोबा कृतज्ञता दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वीस आजी-आजोबा उपस्थित होते. मान्यवरांच्या आणि आजी-आजोबांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आपल्या आजी-आजोबांची पूजा पाय धुवून, फुले वाहून व औक्षण करून पेढे भरविले. यावेळी सर्व आजी-आजोबांनी आपल्या नातवंडाना शुभाशीर्वाद दिला. नेमळे संस्थेचे अध्यक्ष यांनी आलेल्या सर्वांना भेट वस्तू म्हणून टॉवेल दिले तसेच सर्व मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ म्हणाले, सध्या मुलांना संस्काराची अधिक आवश्यकता असून आजी-आजोबा जे सांगतात ती खरोखर अनुभवाची, संस्काराची शिदोरी असते. ती नातवंडाच्या भवितव्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. म्हणून शासनाने सुरु केलेला हा 'आजी-आजोबा कृतज्ञता दिन' स्तुत्य उपक्रम आहे, असेही उद्गार त्यांनी काढले. ज्युनिअर कॉलजचे प्रा. लवू जाधव म्हणाले," संस्काराची जडणघडण आजी-आजोबा करतात. म्हणून आजी - आजोबा है एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे."

यावेळी आजी-आजोबांविषयी वि‌द्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. यामध्ये सिद्धी राऊळ, लौकिक कदम, जान्हवी राऊळ, भक्ती कलांगण, शाजिया कालेलकर, वैष्णवी धुरी, शुभम पाटकर, सुजल नाईक, फरान कर्णेकर, पार्थ दाभोळकर, प्रणया राऊळ, नेहा घोगळे, मंथन जोडमोट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी महादेव साळगावकर, सावित्री धावडे, प्रकाश शिरसाट, यमुनाबाई चव्हाण, अनुराधा ठाकरे, शुभांगी वाडियेकर, बच्चू आंबेरकर, सीताराम राऊळ, गुरुनाथ गावडे, नजमाबी रशीद आजगावकर, चंद्रकांत विटेकर, बाळकृष्ण धावडे, हरिश्चंद्र चव्हाण, ताहिर शेख, गणपत कापडी, नारायण धुरी, युसुफ कुडाळकर, वसंत नाईक आदि आजी-आजोबा आवर्जून उपस्थित होते.  कार्यक्रमास प्रशालेतील सर्व सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अनिल कांबळे यांनी केले. आभार नितीन धामापुरकर यांनी मानले.