
कुडाळ : नगरपंचायतीने कुडाळात भाजी विक्रेत्यांवर रस्त्याच्या कडेला बसून विक्री करण्यावर तातडीने निर्बंध जाहीर केले. आज बुधवारचा बाजार भरतो हे माहीत असतानाही सूचना देण्यास वेळ न देता कालच्या पत्राने आज तातडीने कारवाईची सुरुवात करण्यात आली. या अचानक मोहिमेमुळे कुडाळ पोलीस स्टेशन परिसरात जे स्थानिक भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी अचानक गोंधळ उडाला आणि विक्रेते असणारे स्थानिक शेतकरी संतप्त झाले. त्यांच्या मदतीला भाजपा नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर धावून गेले आणि प्रशासनाला कारवाई करण्यापासून रोखले. यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. यावेळी ही कारवाई नियमबाह्य असून योग्य पद्धतीने व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी विरोध नाही पण नियमानुसार कारवाई करा अशी मागणी कुडाळ भाजपा नगरसेवकांची यावेळी केली.
कुडाळ नगरपंचायतच्या वतीने स्थानिक भाजी विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पोलीस बंदोबस्त सहित नगरपंचायत प्रशासनाने हाती आज रोजी हाती घेतली, त्यावेळी हा प्रकार घडला. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. यापूर्वी सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही न करता, स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा नेमून न देता स्थानिक भाजी विक्रेत्यांना भर बाजाराच्या दिवशी रस्त्यावरून अचानक हटवण्याची कार्यवाही सुरू केली गेल्याने भाजपाचे नगरसेवक इथे चांगलेच आक्रमक झाले. जो पर्यंत सर्वसाधारण सभेत ठरलेल्या सूचना पालन होत नाही तोपर्यंत कोणालाही हटवू नये अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली. यावेळी उडालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे काही काळ त्या परिसरात वातावरण तंग झाले होते.त्यावेळी सतिश कुडाळकर, तसेच स्थानिक भाजी विक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपंचायत अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.