
कणकवली : शहरातील पटकीदेवी ते नागवे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी खड्डे न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने देण्यात आला होता. त्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने दखल घेतली. कार्यकारी अभियंत्यांना पटकीदेवी ते स्वयंभू मंदिर पर्यंतच्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले.
कणकवली शहर भाजपाच्या वतीने चार दिवसांपूर्वी पटकीदेवी ते नागवे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत उपकार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर हे काम मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी आम्हाला मंजुरीचे आदेश नकोत. तर प्रत्यक्षात काम केव्हा करणार ते सांगा. त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी पटकी देवी ते स्वयंभू मंदिर पर्यंतचे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडु असा इशारा देण्यात आला होता.
भाजपचे किशोर राणे, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांचे देखील लक्ष वेधले होते. तर आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सदर कामाबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार लगेचच आज सोमवारपासून या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. याबद्दल भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंत्यांचे देखील लक्ष वेधले होते. दरम्यान रेल्वे स्टेशन रोडवरील खड्डे देखील तातडीने बुजवा अशा, अशी मागणी नगराध्यक्ष नलावडे यांनी केली होती. त्यावर येत्या आठ दिवसात रेल्वे स्टेशन रोडवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन कार्यकारी अभियत्यांनी दिल्याची माहिती नलावडे यांनी दिली.