
वैभववाडी : मानव विकास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यासाठी ७गाड्या मंजूर आहेत. या गाड्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक होणं गरजेचं आहे. मात्र या गाड्यांच्या इतर तालुक्यात फे-या सुरू आहेत. या फे-या तात्काळ थांबवून तालुक्यातील एसटीचे वेळापत्रक सुरळीत करा.येत्या चार दिवसांत हे न झाल्यास विद्यार्थ्यांसहीत बसस्थानकात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे इशारा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी एसटी महामंडळाला दिला आहे.
तालुक्यात मानवी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यावरुन श्री रावराणे यांनी वाहतूक नियंत्रकांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात महाविद्यालय, १७ माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयासहीत अनेक प्राथमिक शाळा आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी शासनाने मानव विकास योजनेअंतर्गत ७ एसटी बस मंजूर केल्या आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहेत. मात्र सध्या या गाड्यांच वेळापत्रक कोलमडले आहे. तालुक्यासाठी मंजूर असलेल्या गाड्या इतर तालुक्यात सोडल्या आहेत. यामुळे येथील गाड्यांच वेळापत्रक विस्कळित झाले आहे. गाड्या वेळेत नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे इतर तालुक्यात सुरू असलेल्या एसटी फे-या तात्काळ थांबविण्यात याव्यात. त्या गाड्यांच्या फेऱ्या वैभववाडी तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी केल्या जाव्यात. अन्य प्रवासी वाहतूक टाळावी, या गाड्यांवर महीला वाहक असाव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास विद्यार्थ्यांसहीत बसस्थानकात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री रावराणे यांनी दिला आहे.