LIVE UPDATES

10 - 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

बोर्डाच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल ?
Edited by: ब्युरो
Published on: November 24, 2023 10:38 AM
views 475  views

सिंधुदुर्ग : शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन टप्प्यातील महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत हा बदल केला जाणार आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होणार आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामायी आणि वार्षिक पद्धतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा एक टप्पा आहे. त्यामुळे या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते. अनेकदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. तर कधी कधी शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची गरज असते.