शिरशिंगे धरण प्रकल्पा संदर्भात महत्वाची बैठक

Edited by: विनायक गांवस
Published on: January 27, 2025 12:53 PM
views 254  views

सावंतवाडी : शिरशिंगे धरण प्रकल्पासंदर्भात अधिकारी वर्गाची बैठक माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पार पडली. प्रजासत्ताक दिनी प्रकल्पस्थळी श्री. केसरकर यांनी भेट दिली. लवकरच हा सुरू होणार असून काश्मीर खोऱ्यातील वैशिष्ट्य असणारा हा भाग सुजलाम, सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले,शिरशिंगे धरण प्रकल्प २०१२ पासून बंद होता‌. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास हा विषय आणल्यानंतर या प्रकल्पाच्या अडचणी जाणून घेतल्या. १०१ कोटी रुपये खर्च यापूर्वी प्रकल्पावर झाला होता. आता नव्यानं मंत्रीमंडळान ६०९ कोटींची सुधारीत मान्यता दिली आहे. हा प्रकल्प शिरशिंगे गावात होत असला तरी वेर्ले, शिरशिंगे, कलंबिस्त आदी अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. यामुळे सुजलाम सुफलाम हा भाग होणार असून काश्मीरच्या खोऱ्यात जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी वैशिष्ट्य या गावात आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच आयुष्य बदलेल व पर्यटनाला साथ देईल. बराच काळ प्रकल्प बंद राहिल्याने स्थानिक प्रश्न आहे. याबाबत संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणार आहे अशी माहिती दिली. रविवारी शिरशिंगे गावात प्रकल्पस्थळी भेट दिली.